धाराशिव (प्रतिनिधी)-मराठवाडा मुक्ती संग्राम महोत्सवाचे हे अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे या निमित्ताने या मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच उच्च शिक्षणाच्या विद्यार्थ्यांनी या विषयावर संशोधन करून याचे अध्ययन सखोल पणे करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या धाराशिव येथील उपकेंद्रात यासंबंधी अध्यासन केंद्र सुरू करावे अशी मागणी सिनेट सदस्य देविदास पाठक यांनी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे की मराठवाडा मुक्ती संग्राम मध्ये धाराशिव जिल्ह्याचे मोठे योगदान आहे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये निजाम राजवटीविरुद्ध लढलेली अनेक गावे वास्तु तसेच शहीद हुतात्मे यांच्या स्मृती नवीन पिढीला निश्चितच प्रेरणादायी आहेत. हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी यावर सखोल अभ्यास संशोधन तसेच याचे अध्ययन नीट होणे गरजेचे आहे. त्यासाठी धाराशिव इथं असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राच्या परिसरात याचे अध्यासन केंद्र सुरू केल्यास धाराशिव या निती आयोगाने मागास म्हणून जाहीर केलेल्या जिल्ह्यात इतिहास अभ्यासक विद्यार्थ्यांना एक नवीन संशोधनाचे दालन उपलब्ध होईल.

यावेळी सिनेट सदस्य श्री नाना गोडबोले हेही उपस्थित होते.


 
Top