धाराशिव (प्रतिनिधी)-मागील काही महिन्यापासून सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाबाबत शेतकर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. याबाबत नु्नतीच एक बैठक घेवून खासदार ओमराजेनिंबाळकर यांनी उपविभागीय कार्यालय व भूमिअभिलेख कार्यालय या दोघांच्या संयुक्त समितीकडून चुकांची दुरूस्ती केली जाईल असे ओमराजेनिंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील व जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीत सोलापुर-तुळजापुर-धाराशिव रेल्वे मार्गाच्या कामाचा तसेच रेल्वेसाठीचे भुसंपादनाचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. 


रेल्वे विभागाने शेतकर्‍यांची जमिनी थेट खरेदी करावी

या बैठकी मध्ये रेल्वेसाठी शेतकर्‍यांची संपादीत होणार्‍या जमीनीचे थेट खरेदी प्रस्ताव द्यायचे का नाही हे प्रत्येक गावाने ठरवावेत असे मत खासदार ओमराजेनिंबाळकर यांनी मांडले. यावर काही अधिकार्‍यांनी असे करता येत नाही असे सांगताच खासदार राजेनिंबाळकर यांनी पुणे विभागात शेतकर्‍यांकडून थेट जमिनी खरेदी करण्यात आल्या आहेत असे सांगितले. सदर प्रस्ताव रेल्वे विभागाने वरिष्ठ विभागास सादर करावेत. प्रत्यक्षात रेल्वे मार्गसाठी भू-संपादीत क्षेत्रात फळझाडे, विहीर, बोअरवेल,पाईपलाईन जात असेल तर त्याचा मोबदला देण्यात यावा व संयुक्त मोजणीचा अहवाल भू-संपादीत गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथील सूचना फलकांवर प्रसिध्द करण्यात यावा. या बैठकीत शेतकर्‍यांना कोणता अधिकारी त्रास देत असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले.


नजरचुकीने विहीर व अन्य नोंदी राहिल्यास 7 दिवसाचा अवधी

जर एखादी गोष्ट नजर चुकीने राहीली असेल तर 7 दिवसाच्या सूचना व हरकती उपविभागीय अधिकारी धाराशिव यांच्याकडे लेखी दाखल कराव्यात व उपविभागीय कार्यालयाने  व भूमिअभिलेख कार्यालयाने त्या दुरुस्त करण्यासाठी संयुक्त प्रत्यक्ष पाहणी करून पडताळणी करावी. अशा महत्वपूर्ण सूचना जिल्हाधिकारी, भू-संपादन अधिकारी व रेल्वे  विभागाच्या अधिकार्‍यास खासदार ओम राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी केल्या.

या बैठकीस या रेल्वे मार्गांचे कार्यकारी अभियंता, (सिव्हील) बनसोडे, नारायणन, उपविभागीय अधिकारी खरमाटे अधिक्षक, भुमी अभिलेख व संबंधित अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

 
Top