तुळजापूर (प्रतिनिधी)-राज्यातील अनेक भागात अजून पेरण्या झालेल्या नाहीत. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे. सरकारी मदत मिळत नाही, अन्नदाता बेहाल झाला असून आत्महत्या चारपटींनी वाढल्या आहेत. बळीराजावरील हे अस्मानी, सुलतानी संकट टळू दे, भरपूर पाऊस पडो, पीक भरघोस येवू दे आणि शेतकर्‍याच्या घरी आर्थिक संपदा येऊ दे. त्याचबरोबर देशावर व महाराष्ट्रावर आलेले भाजपाचे संकट दूर होऊन कॉंग्रेसची सत्ता येऊ दे, असे साकडे आई तुळजाभवानी चरणी घातल्याचे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले धाराशिव व सोलापूरच्या दौर्‍यावर असून सकाळी त्यांनी सहकुटुंब आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, प्रदेश चिटणीस अष्टेकर, महिला प्रदेश सरचिटणीस शीला उंबरे-पेंढारकर यांच्यासह कॉंग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. 

पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, भाजपाचे राज्यातील व केंद्रातील सरकार शेतकरी विरोधी आहे, शेतकर्‍यासमोर सर्वबाजूंनी संकटं उभी आहेत पण भाजपाचे हे सरकार केवळ पोकळ घोषणा करत आहे, शेतकर्‍यांपर्यंत मदत पोहचतच नाही. शेतकरी विरोधी भाजपाला पावसाळी अधिवेशनात जाब विचारू. महाराष्ट्रात भ्रष्टाचारी व्यवस्था आहे, तसेच लोकशाही व संविधान संपवण्याचे काम केंद्र सरकारकडून केले जात आहे. मोठ्या संघर्षानंतर, कॉंग्रेस विचाराने देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे पण आज देशाचे स्वातंत्र्य, लोकशाही व संविधान धोक्यात आहे. मणिपूर  दिवसांपासून पेटलेले आहे आणि देशाचे पंतप्रधान मात्र अमेरिकेत भाषणे देत आहेत. देशावरचे भाजपाचे हे संकट दूर झाले पाहिजे व स्वातंत्र्याचा सूर्य कायम राहिला पाहिजे.


 
Top