धाराशिव (प्रतिनिधी)- जुन्या पेन्शनचा लाभ मिळण्याच्या मागणीसाठी भूमच्या ग्रंथपालाने माध्यमिक  शिक्षणाधिकार्‍यांच्या दालनातच मंगळवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला. कर्मचार्‍यांनी वेळीच रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला. 

राज्यातील 924 ग्रंथपाल जुन्या पेन्शनच्या लाभासाठी विविध मार्गांनी पाठपुरावा करत आहेत. जिल्हा परिषद मुख्यालयात भूम येथील रविंद्र हायस्कूलचे ग्रंथपाल बाळू कुंभार मंगळवारी सकाळी 11.30 च्या सुमारास शिक्षणाधिकारी गजानन सुसर यांच्या दालनात आले. त्यांनी जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्याची मागणी केली. यावेळी सुसर यांनी त्यांना हा प्रश्न शासनस्तरावचा असल्याचे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र कुंभार यांनी कोणताही विचार न करता अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

कुंभार 1994 पासून अर्धवेळ ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. 2006 पासून शासनाच्या निर्णयानुसार कुंभार पूर्णवेळ ग्रंथपाल झाले. त्यामुळे 1994 तेम 2006 या दरम्यानची अर्धवेळची सेवा पूर्ण गृहीत धरून जुन्या पेन्शनच्या लाभासाठी ग्राह्य धरण्यात यावी, या मागणीसाठी कुंभार पाठपुरावा करत होते.  छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाने कुंभार यांच्या बाजुने निर्णय दिला होता. याबाबत 30 मार्चपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. मात्र शिक्षण विभागाने निर्णय घेतला नाही.


 
Top