उमरगा (प्रतिनिधी)- आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या संकल्पनेतून ज्ञानज्योत सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या वतीने उमरगा व लोहारा तालुक्यातील प्रत्येक शाळेतील अनुक्रमे पहिल्या व द्वितीय येणार्या व 12 वी परीक्षेमध्ये प्रत्येक शाखेतील प्रथम येणार्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व या दोन्ही तालुक्यातील 100 टक्के निकाल लागलेल्या शाळांचा तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या व्यक्तींचा ज्ञानज्योती पुरस्कार सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा रविवारी (दि.2) सन्मान करण्यात येणार आहे.
ज्ञानज्योती सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या वतीने मागील 14 वर्षांपासून आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या संकल्पनेतून उमरगा व लोहारा तालुक्यात गुणवंत विद्यार्थी सत्कार व ज्ञानज्योती पुरस्कार देण्यात येतात. 2023 च्या दहावी परीक्षेत उमरगा लोहारा तालुक्यातील प्रत्येक शाळेतील अनुक्रमे पहिल्या व द्वितीय येणार्या व बारावी परीक्षेत प्रत्येक शाखेतील प्रथम येणार्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व या दोन्ही तालुक्यातील 100 टक्के निकाल लागलेल्या शाळांचा तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षप्रमुख मंगेश चिवटे, सामाजिक कार्यकर्त्या रेखाताई सुर्यवंशी, महाराष्ट्र चँपीयन तथा कुस्ती मार्गदर्शक धनराज भुजबळ, माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शहाजी चालुक्य, जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थान राष्ट्रीय महामार्ग रुग्णवाहिका चालक शेषेराव लवटे, प्रगतशील शेतकरी अॅड. अमर पवार यांना ज्ञानज्योती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. उमरगा शहरातील आशा मंगल कार्यालय येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार व ज्ञानज्योती पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि.2) सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. माजी खासदार प्रा रविंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी नगरच्या उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर या प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी उमरगा बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, युवा नेते किरण गायकवाड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, माजी सभापती मोहयोद्दीन सुलतान, ज्ञानज्योती सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष विजय वडदरे, सचिव प्रदीप मदने, शिवसेनेचे उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी उमरगा व लोहारा तालुक्यातील सर्व पालक व विद्यार्थीनीं उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.