धाराशिव (प्रतिनिधी)-इमारतीच्या छतावरील पाणी जमिनीत मुरविण्याचा मंत्र जिल्हयातील 11 पोलीस ठाण्यात जपला जाणार आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे संकल्पनेतुन धाराशिव जिल्हयातील 11 पोलीस ठाणे मध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा राबविण्यात येणार असून, आयसीआयसीआय फाउंडेशनच्या माध्यमातुन हा उपक्रम धाराशिव जिल्हयात राबविला जाणार आहे.
भुगर्भातील पाण्याची पातळीत सातत्याने घट असुन त्यासाठी शासनाने विविध प्रकारे उपाययोजना केलेल्या आहेत. भुगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी इमारतीच्या छतावर पडलेले पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे व त्यापासुन भुगर्भातील पाण्याची पातळी वाढवणे हा या संकल्पनेचा उद्देश आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातुन छतावर पडलेले पाणी कुपनलिकेत सोडणे आणि त्यातुन भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे हा प्रयोग धाराशिव जिल्हयात राबविण्यात येणार असुन, धाराशिव जिल्हयातील धाराशिव, कळंब, वाशी, भुम आदी तालुक्यातील 11 पोलीस स्टेशनच्या कार्यालयावर यंत्रणा राबवली जाणार आहे. यासाठी आयसीआयसीआय फाउंडेशनकडुन रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी 25 लाख रुपयाचा खर्च केला जाणार आहे. यासाठी संबंधीत 11 पोलीस स्टेशनच्या इमारतीजवळ 100 फुट खोलीची कुपनलिका खोदाई केली जाणार आहे. तसेच या माध्यमातुन छतावरील पाणी पीव्हीसी पाईपच्या माध्यमातून एकाच ठिकाणी कुपनलिकेच्याजवळ संकलित केले जाणार आहे. त्यावर दोन फिल्टर बसविले जाणार आहेत. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व आयसीआयसीआय बँकेचे एच. आर. राजीव दुबे यांच्या हस्ते या योजनेची सुरुवात केली जाणार आहे.