धाराशिव / प्रतिनिधी- 

बाल न्याय मुलांची (काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 व एकात्मिक बाल संरक्षण योजनेअंतर्गत प्रत्येक गावामध्ये ग्राम बाल संरक्षण समितीची स्थापना करण्यात आली आहे. बालकांचे हक्क अबाधित राखून त्यांच्या सर्वांगीन विकासाला चालणा देणे, बालकांच्या समस्यांची सोडवणूक करणे, बालकांचे विविध योजनांचा समन्वय साधणे, गाव पातळीवरील बालकांच्या हिताचे रक्षण करण्याच्या हेतूने महिला व बाल विकास अधिनस्त जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने ग्राम बाल संरक्षण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, बालक यांचा समावेश असून त्यांना बालकांचे हक्क, समितीचे कार्य आणि जबाबदा-या याबाबत दि. 26 ते 27 एप्रिल 2023 रोजी दोन दिवसीय प्रशिक्षण जिल्हा विधी सेवाप्राधिकारण सभागृह धाराशिवयेथे आयोजित करण्यात आले होते.

   ग्राम बाल संरक्षण समितीचे प्रशिक्षण सत्राचे उदघाटन न्यायमुर्ती तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव वसंत यादव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून बाल न्यायमंडळाचे सदस्य डॉ.अश्रुबा कदम व वैशाली धावणे, जिल्हा परिविक्षा अधिकारी शिरीष शेळके व बाल संरक्षण अधिकारी प्रज्ञा बनसोडे हे उपस्थित होते.

  ग्राम बाल संरक्षण समितीची कार्यकक्षा पाहता समितीच्या सदस्यांनी अतिशय संवेदनशिलपणे काम करुन बालकांचे हक्क अबाधित राहतील व योग्य तो न्याय मिळेल याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. असे मत न्यायमुर्ती वसंत यादव यांनी व्यक्त केले. ग्राम बाल संरक्षण समितीची रचना, कर्तव्य व जबाबदा-या याबाबत डॉ.अश्रुबा कदम व ॲड.वाशाली धवणे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या दुस-या सत्रामध्ये शिरीष शेळके यांनी बालकांवर होणारे अत्याचार, कायदे विषयक बाबी व त्यांचे पुनर्वसन व महिला बाल विकास विभागाच्या विविध योजनाबाबत मार्गदर्शन केले.

   जिल्हयात बाल विवाहाचे प्रमाण जास्त असून या दृष्टीने शासनाच्या उपाययोजना, टास्क फोर्स व समिती सदस्यांची जबाबदारी यावर बाल संरक्षण अधिकारी प्रज्ञा बनसोडे यांनी सविस्तर सखोल विवेचन केले. या प्रशिक्षणासाठी धाराशिवतालुक्यातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

  या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनिल अंकुश यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या दोन्ही सत्रांचे सुत्रसंचलन बाल संरक्षण अधिकारी प्रज्ञा बनसोडे यांनी केले व आभार प्रदर्शन संध्या तेरकर व शारदा गंडले यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनिषा जोगदंड, हर्षवर्धन सेलमोहकर, निलेश थावरे यांनी परिश्रम घेतले.


 
Top