धाराशिव / प्रतिनिधी-

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणार्‍या मणिकांत राठोड याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस पदाधिकार्‍यांनी शहर पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतरही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी बघ्याची भूमिका घेतल्याबद्दल जाहीर निषेधही नोंदविण्यात आला आहे.

 काँगे्रसच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले की, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी भारतीय जनता पार्टीचे चित्तपूर (कर्नाटक) विधानसभेचे उमेदवार मणिकांत राठोड यांनी दिली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून राठोड हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. कर्नाटकात त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे श्री.खरगे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या जीविताला धोका आहे. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराने निवडणुकीच्या काळात अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्षांना जीवे मारण्याची दिल्याचा सबख पुरावा देखील सोबत जोडलेला आहे. त्यामुळे राठोड याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 


 
Top