धाराशिव / प्रतिनिधी
माध्यमांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पहिले जाते. मात्र माध्यमकर्मींच्या प्रश्नांच्या सोडवणुकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे पत्रकारिता व्यवसाय करणार्या पत्रकार बांधवांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्या मागण्या शासनाने तात्काळ सोडवाव्यात यासाठी व्हाईस ऑफ मीडियाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर दि.११ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.
व्हाईस ऑफ मीडियाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन भरीव निधी द्यावा. तर पत्रकारितेत पाच वर्षे पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी. तसेच वृत्तपत्रांना सध्या जाहिरातींवर लागू असलेला जीएसटी रद्द करावा. तर पत्रकारांच्या घरांसाठी विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा. तसेच कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे. तर शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. त्यामुळे लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिका इतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. त्याबरोबरच साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती देण्यात याव्यात या मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व पत्रकारांच्यावतीने एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, कार्याध्यक्ष रहीम शेख, साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते, महानगराध्यक्ष मल्लिकार्जुन सोनवणे, तालुकाध्यक्ष अमजद सय्यद, कार्यवाहक कुंदन शिंदे, बालाजी सुरवसे, ओंकार कुलकर्णी, अल्ताफ शेख, विकास सोनवणे, सलीम पठाण, राजकुमार गंगावणे, शेख जफर, किरण कांबळे, आकाश नरोटे, अनंत साखरे, शितल वाघमारे, मुस्तफा पठाण, शहानुर पठाण, राजेश बिराजदार, बिभीषण लोकरे, रामेश्वर डोंगरे आदींची उपस्थिती होती.