धाराशिव / प्रतिनिधी-

 येरमाळा पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांना धाराशिव येथील जिल्हा व प्रमुख सत्र न्यायाधीश अंजु शेंडे यांनी पत्नीच्या खुनात दोषी ठरवित जन्मठेपेची व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सपोनि चव्हाण हे अटक झाल्यापासुन कारागृहात आहेत, हे प्रकरण आरोपी न्यायालयीन कोठडीत (अंडर ट्रायल) ठेवून चालविले गेले हे विशेष. हे हत्याकांड त्यावेळी राज्यभर गाजले होते. आरोपी सपोनि चव्हाण यांनी पत्नीला गोळी घालून खुन केल्यानंतर हे प्रकरण लपवण्यासाठी काही पुरावे नष्ट केले त्यामुळे कलम 201 अंतर्गत 7 वर्ष सश्रम करावासाची शिक्षा व 10 हजार रुपये दंड थोठावला आहे. दोन्ही शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून रश्मी नरवाडकर यांनी बाजू मांडली. 

 मयत मुलीचे वडील शशांक पवार यांच्या तक्रारीवरून नवरा सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाणसह सासू विमल चव्हाण, सासरा बापू चव्हाण या तीन आरोपी विरोधात भादंवि कलम 302,498 अ व 34 अन्वये गुन्हा नोंद करून तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्याकडे देण्यात आला होता. यातील  सासू विमल चव्हाण व सासरा बापूराव चव्हाण यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

 25 जानेवारी 2018 रोजी सकाळी येरमाळा पोलिस ठाण्यातील सपोनि विनोद चव्हाण यांची पत्नी मोनाली यांच्या छातीत गोळी लागल्याने त्यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात नेले जात असताना त्यांचा मृत्यू झाला होता.

 मोनाली व विनोद चव्हाण यांचा २०१४ साली विवाह झाला होता.लग्नाला तीन वर्षे झाले तरी मूल होत नाही या कारणावरून नैराश्येतून मोनाली यांनी पतीच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याचे सांगितले गेले मात्र अंत्यविधी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोनालीचे वडील शेषांक जालिंदर पवार ( रा. चौसाळा जि. बीड ) यांनी मुलगी मोनालीने आत्महत्या केली नसून तिचा चारित्र्याच्या संशयावरून तसेच हुंड्यातील राहिलेली ५ लाख रुपयांची रक्कम आण म्हणून पतीनेच खून केल्याची तक्रार दिली. मोनालीचे वडील शशांक पवार हे शिरूर पोलिस ठाण्यात सहायक फौजदार म्हणून कार्यरत होते.

 
Top