धाराशिव / प्रतिनिधी- 

देशाचा विकास करायचा असेल तर ग्रामीण भागाचा समग्र विकास होणे गरजेचे आहे. हरात विविध उद्योग व्यवसाय असल्याने तेथे रोजगाराची साधने उपलब्ध असतात. परंतु ग्रामीण भाग हा शेतीवर अवलंबून आहे. शेतीसाठी मुबलक पाणी असावे लागते. त्यासाठी जलयुक्त शिवार अभियानची भूमिका महत्त्वाची आहे. म्हणून गावकऱ्यांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करावे, असे आवाहन तहसीलदार शिवानंद बिडवे यांनी केले.

जलयुक्त शिवार अभियान 2.0 मध्ये उस्मानाबाद तालुक्यातील वरवंटी गावाची निवड झाली आहे. यानिमित्ताने बुधवार, दि. 10 मे रोजी गावात शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमास सरपंच प्रतिनिधी शिवाजी देशमुख, उपसरपंच इंद्रजित देशमुख, लघुपाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता जे. सी. शेख, कृषी विभागाचे श्री. बनसोडे, जलसंधारण अधिकारी आर. व्ही. शिंदे, मंडळ अधिकारी श्री. डोके, तलाठी एम. बी. कदम, ग्रामसेवक श्री. मडके, कृषी सहायक वाडकर यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना श्री. बिडवे म्हणाले की, अनेक गावांनी पाण्याचे योग्य नियोजन करून शेतीचा विकास साधला आहे. परंतु बहुतांश गावात अजूनही नियोजन केलेले नाही. महाराष्ट्र शासनाने पहिल्या टप्प्यात राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचा सकारात्मक परिणाम दिसून आला. आता दुसऱ्या टप्प्यात वरवंटी गावाची निवड झाली असल्याने गावाला विकास करण्याची संधी मिळाली आहे. गावकऱ्यांनी हे अभियान यशस्वीपणे राबवून शेती समृद्ध करावी, असेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात जलसंधारण अधिकारी आर. व्ही. शिंदे यांनी जलयुक्त शिवार अभियान 2.0 विषयी सविस्तर माहिती दिली.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत सरपंच प्रतिनिधी शिवाजी देशमुख, उपसरपंच इंद्रजित देशमुख व ग्रामपंचायत सदस्यांनी केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब बेद्रे यांनी केले. कार्यक्रमास गावातील शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर तहसीलदार श्री. बिडवे यांनी शिवारफेरी काढून गावातील नियोजित स्थळांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.


 
Top