धाराशिव (प्रतिऩीधी) :-  भाजपा सरकारकडून इडीमार्फत नोटीस पाठवून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांना नाहक त्रास दिला जात असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी(दि.22) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपा व इडीविरोधात जोरदार घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन करण्यात आले. विरोधकांचा आवाज दडपण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात असून लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. इडी, सीबीआय, एनआयबी अशा केंद्रीय यंत्रणांचा दुरूपयोग करुन विरोधी पक्षांची मुस्कटदाबी केली जात असल्याबद्दल भाजपा सरकारचा तीव्र निषेध यावेळी नोंदविण्यात आला. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटीपेक्षा जास्त मोठ्या भ्रष्टाचाराचा खटला ठेवला गेला. त्यांना 13 महिने तुरूंगात ठेवण्यात आले. मात्र चौकशीत हे सत्य नसल्याचे निष्पन्न झाले. माजी मंत्री नवाब मलिक यांनाही त्यांनी काही चुकीच्या गोष्टी लोकांसमोर आणल्या म्हणून तुरूंगात डांबण्यात आले. ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आली. ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्यामागेही चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला. तसेच इडीचा गैरवापर करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांना त्रास देण्याचा व त्यांची नाहक बदनामी करण्याचा प्रकार चालू आहे. यंत्रणांचा हा गैरवापर राष्ट्रवादी काँगे्रस पक्षच नव्हे, तर अन्य विरोधी पक्षातील नेत्यांबाबतही सुरू आहे. 

साम, दाम, दंड, भेद करून कोणत्याही मार्गाने सत्ता मिळवण्यासाठी बिगरभाजप राज्यात भाजपचे सुरू असलेले उद्योग संपूर्ण देशाने पाहिले आहेत. फोडाफोडीचे राजकारण करून आणि आमदार पळवून राज्यातील सरकार पाडण्याचे प्रयोग सुरू आहेत. महाराष्ट्र राज्यात तर आता खोके सरकार अशीच सध्याच्या सरकारची ओळख झाली आहे. विरोधकांना संपविण्याचे असे विध्वंसात्मक राजकारण देशाच्या व राज्याच्या हिताचे नाही. कर्नाटकमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये अशा राजकारणाला जनतेने नाकारल्याचे दिसून आले. 

हेच चित्र आगामी काळात देशात व महाराष्ट्रातही दिसू शकेल. विरोधकांवर सुरू असलेल्या दबावतंत्राला लोकशाही मार्गाने विरोध करणे हे निरोगी लोकशाहीकरिता आवश्यक आहे. लोकशाही टिकविण्यासाठी आणि संविधानकर्त्यांना अपेक्षित लोकशाही पुनर्स्थापित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका केंद्र व राज्य शासनास कळवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश  बिराजदार,जिल्हाकार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर,प्रदेश सचिव मसूद भाई शेख,युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर,जिल्हा उपाध्यक्ष कादर खान, वाजिद पठाण,  महिला जिल्हाध्यक्षा  मनीषा पाटील,शहराध्यक्ष आयाज शेख, युवती कार्याध्यक्षा श्वेता दुरुगकर,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असद खान पठाण, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब ननवरे,माजी नगरसेवक पृथ्वीराज चीलवंत, इस्माईल शेख, बाबा मुजावर,  युवा नेते शेखर घोडके, युवक प्रदेश सचिव मीनील काकडे, मजहर शेरिकर, नंदकुमार गवारे, महिला जिल्हाउपाध्यक्षा अनिता राऊत,बिलाल तांबोळी, रणवीर इंगळे, अन्वर शेख,एजाज काजी, रोहित बागल, पंकज भोसले, विवेक साळवे, सचिन तावडे,अमोल सुरवसे,तालुका कोषाध्यक्ष  संजय कावळे, युवक शहराध्यक्ष  सौरभ देशमुख, वैभव मोरे,मलिका फिरोज पठाण,डोंगे बालाजी, प्रेमचंद मुंडे, उद्योग आणि व्यापार शहराध्यक्ष राजपाल दूधभाते यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 
Top