धाराशिव/ प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर झाला असुन त्यामध्ये आमच्या पक्षाला दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो पण जनता हेच आमच खर न्यायालय आहे. सरकारमध्ये हिंमत असेल तर राजीनामा द्यावा व लगेचच निवडणुकीला सामोरे जावे, कारण जनतेच्या न्यायालयात आम्हालाच न्याय मिळणार असल्याचा विश्वास आमदार कैलास पाटील यानी यावेळी व्यक्त केला.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आजच्या निर्णयाने शिंदे सरकारला काही दिवस पदावर राहता येणार असले तरी हा आनंद क्षणभंगुर आहे. मुळ पक्षाला म्हणजे पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या पक्षाच्या प्रतोदला अधिकृत मान्यता न्यायालयाने दिली आहे. तसेच शिवसेना पक्षावर फुटीर गटाला दावा सांगता येणार नसल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. राज्यपालानी केलेली कृती चुकीची असल्याचे न्यायालयाने सांगितल्यानंतर सरकार बेकायदेशीर होते यावर शिक्कामोर्तब झाल्याचे आमदार पाटील म्हणाले. विधानसभा अध्यक्षांनीही पक्षपातीपणा करुन कायद्यानुसार असणाऱ्या प्रतोदला मान्यता न देता फुटीर गटाच्या प्रतोदला तो अधिकारी दिला होता. त्यावरही आता निर्णय झाल्याने हे सरकार अनैतिक व असंवैधानिक पध्दतीने स्थापन झाल्याचे सिध्द झाल्याचे पाटील यानी म्हटले आहे. या सरकारच्या मंडळीकडे नैतिकता असण्याचा प्रश्नच नाही, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेबांनी नैतिकता दाखवुन जसा राजीनामा दिला तशी तुमच्यात हिंमत नाही याची कल्पना आहे. तरीही तुम्ही जनतेच्या न्यायालयात यावे व जनताजर्नाधन काय कौल देतो हे पाहवे असे आव्हान आमदार पाटील यानी सरकारला दिले आहे. जनतेच्या न्यायालयावरच आमचा विश्वास असुन त्यासाठी आम्ही कधीही तयार आहोत कारण लोकशाहीत सर्वोच्च असते ती जनता. त्या जनतेच्या मनात आमचे स्थान अढळ असुन त्याचा पुरावा घ्यायचा असेल तर हिंमत दाखवा व मैदानात या असे आव्हान आमदार पाटील यानी दिले आहे.

 
Top