धाराशिव / प्रतिनिधी-

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून  शरद पवार यांनी  निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार , जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील-दुधगावकर  यांनी आपला  राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठविला आहे. 

दरम्यान, इथून पुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असेही पवार यांनी जाहीर केलं. लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी भाषणाच्या शेवटी शरद पवारांनी हा निर्णय जाहीर केला. शरद पवार यांनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचा पूर्वीचा गड समजला जाणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सुरेश बिराजदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपवला आहे. बिराजदार यांनी आपल्या राजीनाम्यात शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा अशी देखील मागणी केली आहे.

आपण राजीनामा देत असलो तरी अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत राहू असे देखील बिराजदार यांनी म्हटलं आहे.

बैठकीत राजीनामे 

राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील-दुधगावकर यांनी पार्टी कार्यालयात बैठक घेवून सर्व पदाधिकारी, राजीनामे दिले असल्याचे ,  प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. यामध्ये जीवनराव गोरे, मसुद शेख, नितीन बागल, मनिषा पाटील, संगीता काळे, खलिफा कुरेशी आदीं मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

 
Top