धाराशिव / प्रतिनिधी-

 जिल्हा परिषद कृषी विभाग मार्फत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही योजना नवीन सिंचन विहीर व इतर घटकासाठी राबविण्यात येत असून या योजनेतून विविध घटकाचा लाभ घेण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जि.प.च्या कृषी विकास अधिकारी यांनी केले आहे.

  कृषी विभागामार्फत राबविण्यात येणारी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही फक्त अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी असून अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ही योजना राबविली जात आहे. या योजनेची महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी अर्जापासून ते निधी वितरणापर्यंतची संपूर्ण कार्यवाही ऑनलाइन पद्धतीने करण्यात येते.

 या योजनेत नवीन सिंचन विहीरीसाठी 2 लाख 50 हजार रुपये, जुनी विहीर दुरुस्तीसाठी 50 हजार रुपये, शेततळे अस्तरीकरणासाठी एक लाख रुपये, वीज जोडणीसाठी 10 हजार रुपये, विद्युत पंपासाठी 20 हजार रुपये, सूक्ष्म सिंचन संच (पूरक अनुदान) 25 हजार रुपये, पीव्हीसी किंवा एचडीपीई पाईपसाठी 30 हजार रुपये, परस बागेसाठी 500 रुपये, इनवेल बोअरिंगसाठी 20 हजार रुपये याप्रमाणे अनुदान देण्यात येते.

  याकरिता शेतकरी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा. शेतकऱ्यांकडे वैध जात प्रमाणपत्र असावे. शेतकऱ्याच्या नावे 7/12 व 8अ उतारा असावा (नगरपालिका हद्दीबाहेरील). नवीन सिंचन विहीर घटकासाठी शेतकऱ्याच्या नावे किमान 0.40 आर एवढी जमीन असावी. (जास्तीत जास्त 6 हेक्टर). नवीन सिंचन विहीर व्यतिरिक्त इतर घटकाचा लाभ घेण्यासाठी किमान 0.20 आर एवढी जमीन आवश्यक. तहसीलदार यांनी दिलेला अद्यावत उत्पन्न दाखला सादर करणे आवश्यक आहे.

 याविषयी पंचायत समिती स्तरावर कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले असून योजनेस पात्र सर्व शेतकऱ्यांनी या योजनेतील घटकाच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. ऑनलाईन अर्ज नजीकच्या आधार सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटर मधून करता येईल. अधिक माहितीसाठी नजीकच्या पंचायत समिती कार्यालयातील कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा किंवा 02472-223794 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जि.प.चे कृषी विकास अधिकारी पी.जी.राठोड यांनी केले आहे.


 
Top