कळंब/ प्रतिनिधी- 
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान, कळंब तालुक्यातील येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या भक्तांसाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत, माजी मंत्री तथा भाजपचे अामदार राणाजगजितसिंह पाटील व ठाकरे गटाचे शिवसेनेचे अामदार कैलास पाटील यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आलेल्या भक्तांसाठी वेगवेगळ्या पध्दतीने सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला.  राजकीय नेत्यांनी  भक्तांच्या सुविधेसाठी केलेले प्रयत्न म्हणजे   देवी चरणी सेवा अर्पण केल्याचे सारखेच आहे. 
  महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, गुजरात आदी राज्यातुन या यात्रेसाठी लाखो संख्येने भाविक आले आहेत. पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी उपविभागीय पोलिस अिधकारी एम रमेश, एपीआय अतुल पाटील, तहसीलदार मनीषा मेने आदी अधिकारी वर्ग यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. येडेश्वरी देवीची पालखी आमराईत आल्यानंतर पाच दिवस या ठिकाणी मोठया उत्साहात यात्रा भरते. या पाच दिवसात िवविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. 
 शुक्रवारी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने भाविकांची मोठी गर्दी झाली होती. देवीच्या पालखी मिरवणुकीनंतर राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या वतीने भाविकांना महाप्रसाद वाटप करुन देवीचरणी सेवा अर्पण करण्यात आली. तसेच उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन थंड मठ्ठा भाविकांना वाटप करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके,जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दिवसभरात हजारो भाविकांनी महाप्रसादाच्या या सेवेचा लाभ घेतला.

 
Top