धाराशिव / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या नियमित कर्ज परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांचा सन्मान आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी बँकेच्या वतीने करण्यात आला. शहरातील जत्रा फंक्शन हॉल येथे आज सकाळी ११ वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या जिल्ह्यात ३७ शाखा कार्यरत आहेत. बँकेच्या जिल्ह्यातील नियमीत कर्ज परफेड करणार्‍या शेतकर्‍यांच्या सत्कार सोहळ्याचे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक सुहास संगमकर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तर व्यासपीठावर बँकेच्या धाराशिव शाखेचे शाखा व्यवस्थापक प्रवीण सोनवळकर यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण सोनवळकर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात ग्रामीण बँकेचे ग्रामीण अर्थव्यवस्थेतील महत्त्व, ग्रामीण बँकेची माहिती व नियमित कर्ज परतफेड करण्याचे महत्व विशद केले. नियमित कर्ज परतफेड केल्याने शासनाकडून पीक कर्जावरील व्याजाची रक्कम परत मिळते, शासनाने नियमित पीककर्ज परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर रक्कम ही दिलेली आहे व यामुळे बँकेत ग्राहकांची चांगली निर्माण होत असल्याचे सांगितले. यानंतर जिल्ह्यातील सुमारे ३०० शेतकर्‍यांचा प्रातिनिधीक स्वरुपात शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुहास संगमकर यांनी नियमित पीक कर्ज परतफेड केल्याने कसे फायदे होतात याचे महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँकेचे अधिकारी दिलीप गाडे यांनी केले. कार्यक्रमास धाराशिव जिल्ह्यातील सर्व बँकेचे शाखा व्यवस्थापक, बँक कर्मचारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top