धाराशिव / प्रतिनिधी-

 जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हयातील नागरिकांना मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा! जिल्हयात आरोग्य विभागा मार्फत दि. 7 ते 14 एप्रिल पर्यंत “सुंदर माझा दवाखाना” व “मिशन आनंदी” मोहिम जिल्हा भरात सर्वत्र राबविण्यात येत आहे.

  दरवर्षी 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. आरोग्य विभागाने यानिमित्त यावर्षी राज्यातील सर्व सरकारी आरोग्य केंद्रामध्ये स्वच्छता मोहिम राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. प्रा. तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून, जनमाणसात आरोग्य सेवा अधिक सुंदर व स्वच्छ लोकाभिमुख करण्यासाठी 7 ते 14 एप्रिल दरम्यान “सुंदर माझा दवाखाना" व "मिशन आनंदी” हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविला जात आहे. “सर्वांसाठी समान आरोग्य सुविधा, सर्वांसाठी आरोग्य” हे यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाचे घोष्य वाक्य आहे. शासकिय रुग्णालये आणि आरोग्य संस्थांमध्ये सर्वांना समान सुविधा उपलब्ध करुन जास्तीत जास्त रुग्णांनी सार्वजनिक रुग्णालयांच्या सुविधांचा वापर केला पाहिजे, या विषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने यानिमित्त या वर्षी राज्यातील सर्व शासकिय संस्थांमध्ये स्वच्छता मोहिम व मिशन आनंदीचे उद्घाटन दि. 7 एप्रिल 2023 रोजी करण्यात आले.

धाराशिव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पाडोळी येथे आज दि. 10 एप्रिल रोजी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी “सुंदर माझा दवाखाना” व “मिशन आनंदी” मोहिम अंतर्गत कार्यक्रमास भेट दिली आणि “मिशन आनंदी” मोहिम या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व धन्वंतरीचे पूजनाने झाली. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या नागरिकांना 30 वर्षावरील असांसर्गिक आजारांत उच्चरक्तदाब, मधुमेह, स्तनांचा, विशेषतः गर्भाशय-तोंडाचा कर्करोग, यांची VIA तपासणी करण्यासाठी जमलेल्या सर्व रुग्णांना मार्गदर्शनपर भाषण केले. तसेच अधिकाधिक रुग्णांनी या मोहिमे अंतर्गत असणाऱ्या सोयी सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनां विषयी माहिती सांगितली व विविध योजनांचा आढावा घेतला. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत व बाह्य परिसर स्वच्छतेची पाहणी केली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवकुमार हालकुडे यांनी भाषणात प्रस्ताविक करताना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले व आजार होण्यापूर्वीच काळजी घेतली पाहिजे, अशी जनजागृती केली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ऐवाळे, वैद्यकिय अधिकारी डॉ. अजय माने, डॉ.महेश दळवे, (TRIFNGO), डॉ. शिरिष घाडी, जिल्हा आरोग्यवर्धिनी सल्लागार डॉ. पल्लवी धनके, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी रेणुका राठोड तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सर्व समुदाय आरोग्य कर्मचारी वृंद उपस्थित होते.

  जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी ठिकाणी ही मोहिम राबवली जात आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.


 
Top