धाराशिव / प्रतिनिधी-

लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेला दोन गटातील तिढा संपुष्टात आणण्यास प्रशासनाला यश आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दोन्ही गटाशी चर्चा करून समाजमंदिर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करण्यात आली तसेच यासाठी ४० लाख रुपयांच्या निधीची तरतुद करण्यात आली. तसेच महापुरूषाची जयंती साजरी करण्याबाबत लावण्यात आलेली बंधनेही उठवण्यात आली आहेत.

गेल्या चार ते पाच वर्षांपासून कामेगाव येथे दोन गटात विविध कारणावरून तणावाचे वातावरण होते. काही काळ वातावरण शांत झाल्यानंतर पुन्हा एखाद्या किरकोळ कारणावरून ठिणगी पडून वाद विकोपाला जात होता. गेल्या आठवड्यापासून महापुरूषाची जयंती साजरी करण्यास मज्जाव करणे, समाजमंदिर बांधण्यास अटकाव आणणे आदी कारणावरून प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे सुमारे २५० ते ३०० नागरिकांचा एक गट जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यासाठी कानेगाव येथून रखरखत्या उन्हात पायी चालत आला होता. यामध्ये महिलांची संख्याही लक्षनिय होती.

सोमवारी सर्व नागरिक धाराशिव येथे आल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला. यावर जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह लोहारा तालुक्यातील विविध अधिकारी तसेच दोन्ही गटांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यामध्ये दोन्ही गटांना अधिकाऱ्यांनी कायदेविषयक तरतुदींची माहिती सांगितली. तेव्हा दोन्ही गटातील प्रमुखांनी एकमताने प्रशासनाच्या निर्णयाला मान्यता दिली. यामध्ये एका गटाचे समाजमंदिर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करण्यात आली. पोलिस विभागाची ही जागा असून येथे पेालिस चौकीही प्रस्तावित आहे. तसेच समाजमंदिर बांधण्यासाठी ४० लाख रुपये निधीही उपलब्ध करण्यात आला आहे. दोन्ही गटांचे समाधान झाल्यानंतर पायी आलेले आंदोलन गावी परतले.

 
Top