उमरगा/ प्रतिनिधी-

चिंचोली जहागीर येथे झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. मयत तरुण हा त्याच्या सासुरवाडीतील एका अल्पवयीन मुलीसोबत लग्नाचा आग्रह करीत होता.  अन्यथा मुलीला पळवून नेतो अशी सतत धमकी देत असल्याने त्याचा खून केल्याची कबुली त्या मुलीच्या पित्याने दिली. खुनाचा एकही पुरावा नसल्याने आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना मोठे कसब पणाला लावावे लागले होते. आरोपीला अटक करण्यात आली असून सध्या तो न्यायलायीन कोठडीत आहे.

तालुक्यातील चिंचोली (जहागीर) येथील जेष्ठ नागरिक चंद्रकांत ममाळे जेमतेम शेती व्यवसाय व शेळीपालनावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, त्यांचा मुलगा शंकर ममाळे वय २८ वर्ष हा चिंचोली रस्त्यालगत असलेल्या देशमुख प्लॉटिंगमधील स्वतःच्या तात्पुरत्या शेडसमोर दि. २५ मार्च रोजी रात्री जेवण करून बाजेवर झोपला होता. शेडमध्ये सोयाबीन व बाजुला शेळ्या होत्या. मध्यरात्रीच्या दरम्यान झोपेत असताना अज्ञात व्यक्तींनी डोक्यात दगड, हत्याराचा वापर करून खून केला होता.पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला. गुन्हयाच्या तपासात घटनास्थळी अज्ञात आरोपीने कांही एक पुरावा ठेवला नसल्याने तपास अधिकारी यांचे समोर गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान होते. पोलीस अधिक्षक उस्मानाबाद, अपर पोलीस अधिक्षक उस्मानाबाद व उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयाचे तपासाच्या अनुषंगाने सदर घटनास्थळावरील मोबाईल टॉवरचे डम्पटाडा व मयताचे मोबाईलवरील घटने दिवशी व त्याचे आदल्या दिवशी कोणी संशयीतांनी कॉल

केले होते का या बाबत तपास करून मोबाईल सी.डी. आर हस्तगत करून गुन्हयाचे अनुषंगाने ३५ ते ४० साक्षीदारांना चौकशी करीता बोलावुन घेवुन त्यांच्याकडे बारकाईने चौकशी केली. यावेळी यातील मयत हा दुसरे लग्न करण्यासाठी संशयीत रमेश शंकर झंपले वय ४५ रा. मुळज याची मुलीस मागणी घातल्याने मयत व संशयीत रमेश झंपले यांने वाघाटपीर यात्रेच्या दरम्यान फोनवर जिवे मारण्याची धमकी दिल्याची माहीती मिळाली. मिळालेल्या माहीती आधारे संशयीत रमेश झंपले याची कसून चौकशी केली असता त्यांने यातील मयत शंकर ममाळे वय 30 रा. चिंचोली (ज) हा संशयीताचे मुली सोबत दुसरे लग्न करून देणे बाबत विचारणा करीत असल्याने व तिला पळवुन नेण्याची धमकी देत असल्याने वाघाटपीर देवाचे यात्रेच्या वेळी मयतास कॉल करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे दिल्याचे कबुल केले. परंतु तो मयतास का मारले व कोणत्या हत्याराने मारले याबाबत सांगत नव्हता. उडवा उडवीचे उत्तरे देवुन तपासात सहकार्य करीत नसल्याने त्यास ४ एप्रिल रोजी सदरील गुन्हयात अटक करून ५ दिवसाची पोलीस कोठडी घेतली त्यानंतर पोलीसी खाक्या दाखविला असता त्यांने गुन्हा कबुल करून मयत हा वारंवार त्याचे मुलीसोबत लग्न करून दे नसता मुलीला

पळवुन नेतो अशी धमकी दिल्याने तो राग मनात धरून मयताचा कायमचा काटा काढण्याचे ठरविले. त्याच्या गावी जाऊन त्याच्यावर आठ ते दहा दिवस पाळत ठेवली व दि. २५ रोजी रात्री चिंचोली (ज) येथे येवुन एका शेतात लपून बसला व मयत शेडच्या समोर बाजेवर झोपी गेल्यावर रात्री उशिरा त्याच्या डोक्यात हातोडी मारून खुन केल्याचे कबुल केले. पोलिसांनी मयतास मारण्यासाठी वापरलेले हत्यार ही ताब्यात घेतले आहे.या गुन्ह्यात गुन्हयात सकृत दर्शनी कांहीएक पुरावा नसताना देखील तब्बल आठ दिवस या गुन्ह्याचा कसून तपास केला तसेच पोलीस विभागाच्या सायबर सेलची मदत घेत मोबाईल सी. डी. आरचे तांत्रिक विश्लेषण करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हयाचा सखोल तपास करून ८ दिवसात गुन्हा उघडकीस आणुन आरोपीस अटक केले असून प्रकरणाचा उलगडा होऊनही आणखीन सखोल माहिती घेण्याच्या उद्देशाने तपास गुप्त ठेवण्यात आला होता. या तपासासाठी पोलीस निरीक्षक मनोज राठोड, सपोनि महेश क्षीरसागर, सपोनि रमेश जाधवर, उस्मानाबाद सायबर सेलचे सपोनि सुदर्शन कासार पो.कॉ बाबासाहेब कांबळे, यासीन सय्यद, हे. कॉ.शिवलिंग घोलसगाव यांनी मेहनत घेतली. या पूर्ण तपासात सायबर सेल उस्मानाबादची भूमिका महत्वपूर्ण ठरली. तपास पूर्ण झाल्यानंतर गुरुवार (दि.२०) रोजी पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड यांनी ही माहिती प्रेस नोट द्वारे दिली आहे.


 
Top