नळदुर्ग / प्रतिनिधी-

नळदुर्ग येथील पवित्र व प्राचिन तसेच प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र रामतीर्थ येथील हनुमान मंदिरात दि.६ एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शेकडो भाविकांनी हनुमान चालीसाचे पठण केले.

 नळदुर्ग येथील श्री क्षेत्र रामतीर्थ हे प्राचिन व श्री प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले श्री क्षेत्र आहे. सध्या याठिकाणी होत असलेल्या विकास कामांमुळे या रामतीर्थ क्षेत्राचा कायापालट होणार आहे. श्रीक्षेत्र रामतीर्थ देवस्थानचे महंत श्री विष्णु शर्मा महाराज व नळदुर्ग येथील त्यांचे युवा सहकारी रामभक्त यांच्या मार्गदर्शनाखाली या श्री क्षेत्र रामतीर्थचा कारभार अतीशय चांगला व योग्य प्रकारे सुरू आहे.

 दि.६ एप्रिल रोजी श्री क्षेत्र रामतीर्थ येथील हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडला. श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सकाळी ७ वा. श्री हनुमान अभिषेक, सकाळी ८ वा. श्री हनुमान शृंगार करण्यात आला. सकाळी १०.३० वा. महाआरती करण्यात आली त्यानंतर दुपारी १२ ते ४ पर्यंत भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी शेकडो भक्तांनी हनुमान चालीसाचे पठण केले.हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र रामतीर्थ येथे अणदुर येथील ज्ञानेश्वर मोकशे यांनी अतीशय सुंदर अशी रांगोळी काढली होती.

 नळदुर्ग शहरातील रोकड्या हनुमान मंदिर, मराठा गल्ली येथील हनुमान मंदिर, शास्त्री चौकातील हनुमान मंदिर तसेच व्यासनगर, व्यंकटेश नगर, इंदिरानगर, वसंतनगर येथील हनुमान मंदिरातही श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वच हनुमान मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सर्वच मंदिरात श्री हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासुनच मोठी गर्दी केली होती.


 
Top