धाराशिव / प्रतिनिधी-

उमरगा चौरस्ता ते कर्नाटक सीमेपर्यंतच्या राज्य मार्गासाठी (क्र.239) कसगी शिवारातील जमिनी बळकावल्याचा आरोप करत 18 शेतकर्‍यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात अ‍ॅड.राम शिंदे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. हक्काच्या जमिनी बाधित झाल्याने वारंवार संबंधित अधिकार्‍यांना निवेदने देऊनही दखल न घेतल्यामुळे याचिका दाखल करण्यात आल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

 उमरगा तालुक्यातील कसगी येथील शेतकर्‍यांच्या जमिनी राज्य मार्गाच्या कामासाठी बाधित झाल्या आहेत. उमरगा चौरस्ता ते कर्नाटक सीमेपर्यंतच्या मार्गावर साईडपट्टयाचे काम सुरू आहे. साईडपट्टयांसाठी कसगी शिवारातील शेतकर्‍यांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत. या जमिनीचा योग्य मावेजा मिळावा याकरिता कसगी येथील 18 शेतकर्‍यांनी संबंधित विभागाकडे वेळोवेळी निवेदने दिली. परंतु संबंधित अधिकार्‍यांकडून दाद न मिळाल्यामुळे कसगी येथील बाधित शेतकर्‍यांनी शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक दिलीप जोशी, कार्याध्यक्ष सरदारसिंग ठाकूर यांच्याशी संपर्क साधला. शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शेतकर्‍यांना न्यायालयात दाद मागण्यात यावी असे सूचित केले. त्यानंतर अमरसिंग राजपूत, विजयसिंग राजपूत, शंकर हाळी, शांतप्पा मुलगे, शिवकांत राचेट्टी, संदीप कांदे, नागेश पुजारी, अर्जुन राजपूत यांच्यासह 18 शेतकर्‍यांनी न्यायालयात धाव घेतली. अ‍ॅड.राम शिंदे यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालयाच्या निकालाकडे बाधित शेतकर्‍यांचे लक्ष वेधले आहे.


 
Top