धाराशिव / प्रतिनिधी-

नळदुर्ग-अक्कलकोट महामार्गाच्या कामासाठी बाधित जमिनीचा योग्य मावेजा संबंधित शेतकर्‍यांना मिळाला पाहिजे. बाधित शेतकर्‍यांवर आपण अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मंगळवारी (दि.28) शेतकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळास दिली.

 आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नळदुर्ग-अक्कलकोट महामार्गाच्या (652) कामासाठी संपादित झालेल्या जमिनीसंदर्भात संबंधित अधिकारी व बाधित शेतकरी प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. बाधित शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मावेजा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. जमिनीच्या मावेजासाठी त्यांनी सुरू केलेला लढा न्याय्य आहे. सदरील प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे उच्च न्यायायालयाकडून शेतकऱ्यांना न्याय मिळेलच. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांनी शेतकऱ्यांची बाजू विचारात घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अशा सूचना भूमिका आ.पाटील यांनी अधिकार्‍यांना दिल्या. तसेच बाधित शेतकर्‍यांवर अन्याय होऊ देणार नाही असे शेतकर्‍यांना त्यांनी आश्वासित केले.

 यावेळी जिल्हा अधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयाचे तुळजापूर तालुका उपअधिक्षक नितीन वाडकर, राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापूरचे कार्यकारी अभियंता यांचे प्रतिनिधी श्री.राजगुरू, शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक दिलीप जोशी, कार्याध्यक्ष सरदारसिंग ठाकुर, बाधित शेतकरी व्यंकट पाटील, दिलीप पाटील, विक्रम निकम, खंडू हलकंबे, रहेमान शेख, सुशांत भूमकर उपस्थित होते.


 
Top