धाराशिव / प्रतिनिधी-
 विशेष अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा (ॲट्रॉसिटी) दाखल केलेल्या खटल्या संदर्भात सुरु असलेल्या एकाही सुनावणीसाठी शासकीय अभियोक्ता शरद जाधवर हे  हजर  राहिले नाहीत.  त्यामुळे त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आदेश विधी व न्याय विभागाने  दिले होते. त्यानुसार आनंदनगर पोलिस ठाण्यात जाधवर यांच्यावर  अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिव तालुक्यातील केशेगाव येथील लहू रामा खंडागळे यांचा मुलगा विकास खंडागळे यास दि.५ मे २०१५ रोजी गावातील   ९ जणांनी जातीवाचक शिवीगाळ करून एका दिवसात ३ वेळा मारहाण केली. तर भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या त्याच्या आई-वडिल, आजी-आजोबा व नातेवाईकांना जातीवाचक शिवीगाळ करून त्यांनाही मारहाण केली. तसेच त्याचे आजोबा रामा खंडागळे यांच्या घरात विकास यास लपवून ठेवले असता आरोपींनी ते घर पेटवून दिले. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध (ॲट्रॉसिटी) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
 तर  पोलिसांनी याप्रकरणी जिल्हा न्यायालयात ९ आरोपी विरोधांत दोषारोपपत्र दाखल केले.  त्यानंतर सरकारी अभियोक्ता जाधवर हे न्यायालयीन सुनवाणीसाठी सतत गैरहजर राहिले. या प्रकरणी न्यायालयाने ताशेरे ओढत जाधवर यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. 

 
Top