कळंब / प्रतिनिधी-

  संघटनेचे भविष्यातील नियोजन, पत्रकारांना रोजगार व व्यवस्थापनाचे धडे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, अशा कृतिशील कार्यक्रमाबरोबरच पत्रकारांच्या पाल्यांसाठी वेगवेगळ्या शिष्यवृत्तीची घोषणा व संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी नव्या दमाचे पत्रकार अनिल म्हस्के यांची निवड अशा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांनी राज्यभरातील व्हॉईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली.

व्हॉइस ऑफ मीडियाच्या केंद्रीय, राज्य, विभागीय व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची दोन दिवसीय बैठक बारामती येथील बारामती क्लब  येथे आयोजित करण्यात आली होती. व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, केंद्रीय सरचिटणीस  चंद्रमोहन पुप्पाला,  केंद्रीय उपाध्क्ष धर्मेंद्र जोरे, कोषाध्यक्ष चेतन बंडेवार,  सारिका  माहोत्रा, प्रदेशाध्यक्ष राजा माने, नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष ग्रामीण अनिल मस्के. राज्य कोर टीमचे प्रमुख सचिन मोहिते, बालाजी मारगुडे,  विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, विजय चोरडिया, अभयकुमार देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या अधिवेशनामध्ये पत्रकारांना घरे बांधण्याच्या विषयासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेच्या हाऊसिंग सोसायटी विभागाचे प्रमुख संजय मालानी यांनी मार्गदर्शन केले. पत्रकारांसाठी नवीन सर्वंकष पत्रकार गृहनिर्माण धोरण तयार करण्यात आले पाहिजे, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. धर्मवीर भारती यांनी घरांच्या प्रोजेक्टबाबत सविस्तर माहिती दिली. पत्रकारांनी आर्थिक स्वावलंबी झाले पाहिजे, यासाठी पत्रकारितेला रोजगाराची जोड दिली पाहिजे, या विषयावर अजय सिंग सावंत यांनी मार्गदर्शन केले. सावंत यांनी आजवर अनेकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. परदेशांमध्ये स्किल वर्करला जास्त संधी असते. परदेशात जाण्याबाबतचा न्यूनगंड दूर सारून पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. या संदर्भात त्यांनी केरळचे उदाहरण दिले.  एप्रिल महिन्यात व्हॉइस ऑफ मीडियाचे विभागीय अधिवेशनाचे नियोजन आणि कौटुंबिक  स्नेहमेळावा, पत्रकारांच्या गटचर्चा व विभागनिहाय परिसंवादामध्ये करण्यात आले. माहिती तंत्रज्ञान व नियोजनाच्या क्षेत्रातील पत्रकारांना आवश्यक असलेला मूलमंत्र चंद्रमोहन पुप्पाला यांनी आपल्या मार्गदर्शनातून दिला. स्वतःला अपडेट ठेवले पाहिजे व सातत्याने अपग्रेड राहिले पाहिजे, तरच आपला बदलत्या परिस्थितीमध्ये निभाव लागू शकतो. आपली भाषा व्यवस्थापन, राहणीमान अपग्रेड करून आपण आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचू शकतो, असे त्यांनी सांगितले.

प्रसिद्ध अशा लाडाची कुल्फी ब्रँडचे प्रमुख राहुल पापळ यांनी लाडाची कुल्फीच्या माध्यमातून केलेला यशस्वी प्रयोग सांगितला. राहुल यांनी पत्रकारांसाठी आपण कोणताही मोबदला न घेता रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ, असे आपल्या मार्गदर्शनातून सांगितले. अवघ्या तीन वर्षांत हजारोंचा आपला उद्योग कोटीवर येऊन पोहोचला, असे सांगितले. राज्यातील सर्व जिल्हा अध्यक्ष यावेळी आवर्जून उपस्थित होते.


 
Top