धाराशिव/प्रतिनिधी

नळदूर्ग व परिसरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नळदूर्ग येथे अपर तहसिल कार्यालय मंजुर करण्याची मागणी पूर्णत्वास जात असून याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुळजापूरच्या शिष्टमंडळाला दिले आहे. दि. ९ मार्च रोजी आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील तुळजापूर तालुक्याच्या शिष्ट मंडळाने मंहसुल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली.

तुळजापूर तालुक्यात १२३ गावांसह अनेक तांडे व वस्त्या आहेत. याशिवाय दोन शहरे असून तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र १४६००९.९२ हेक्टर आहे. मोठे भौगोलीक क्षेत्र व गाव तांडयाची संख्या विचारात घेता नळदूर्ग हा नवीन तालुका करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. मागील ३  वर्षापासून याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, मात्र महाविकास आघाडी सरकारने अनेक दिवस हा प्रस्ताव रेंगाळत ठेवला होता. 

नळदूर्ग शहराला प्राचीन इतिहास असुन पुणे-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील या शहरातून अनेक गावांचा दैनंदिन व्यवहार चालतो. तालुक्यातील काही गावे तुळजापूर पासून 50 किमी पेक्षा जास्त अंतरावर आहेत. त्यामुळे शासकीय कामे, व योजना यासाठी नागरिकांना मोठा त्रास होतो. परंतू राज्यातील इतर ठिकाणच्या मागण्या व यासाठी लागणारी मोठी आर्थिक तरतूद यामुळे नवीन तहसील मंजुरीला वेळ लागत आहे. हि बाब लक्षात घेऊन परिसरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तूर्तास अपर तहसील कार्यालय सुरु करण्याची मागणी आ.राणाजगजिसिंह पाटील यांनी शिष्टमंडळाच्यासह महसुल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना केली. ना. विखे पाटील यांनी हि मागणी मान्य करत लवकरच नळदुर्ग येथे अपर तहसिल सुरु करण्याचे शिष्टमंडळाला आश्वासित केले. त्याबद्दल शिष्टमंडळाने त्यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले.

तथापी, नळदुर्ग येथे तहसील सुरु करण्याची मागणी कायम असून यासाठी पुढेही सातत्याने पाठपुरावा केला जाणार आहे.

 
Top