धाराशिव / प्रतिनिधी-

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या अवस्थेत असलेल्या वडार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन व्हावे याकरिता समाजाचे वडीलबंधू आमदार अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच पैलवान कै.मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली आहे. महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने वडार समाजाच्या विकासाचा पाया रचला असून आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेने समाजाच्या विकासाला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली असल्याचे मत अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष पिराजी बाबुराव मंजुळे यांनी व्यक्त केले.

 अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष पिराजी मंजुळे यांनी सातारा जिल्ह्यातील वडूज येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी समाजाच्या मागण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत असल्याबद्दल अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष पिराजी मंजुळे यांचा वडूज (जि.सातारा) येथे सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी यावेळी वडार समाज संघटनेचे मराठवाडा विभाग अध्यक्ष तथा दलितमित्र शंकर विटकर, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय शिंदे, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर, युवानेते निलेश जाधव आदींची उपस्थिती होती.

 श्री.मंजुळे म्हणाले की, अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटनेच्या माध्यमातून समाजाचे वडीलबंधू तथा औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. समाजाच्या इतर मागण्यांसाठीही सतत पाठपुरावा केल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने वडार समाज आर्थिक विकासासाठी वडार समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापना करून तब्बल पन्नास कोटी रुपयांची तरतूद केली आहे. समाजातील नामांकित मल्ल पैलवान कै.मारुती चव्हाण-वडार यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून पहिल्या टप्प्यात तब्बल 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. इतर प्रमुख मागण्यांसाठी देखील आ.अभिमन्यू पवार यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

 तत्पूर्वी वडार समाजाच्या विकासासाठी महामंडळाची स्थापना व्हावी याकरिता मोलाची कामगिरी केल्याबद्दल श्रीकांत देवकर यांच्या हस्ते श्री.मंजुळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप बनसोडे, सचिन इंगळे, मोहन पवार, हनुमंत पवार, तानाजी मोरे, अनिल मोरे, गणेश इंगळे, निखिल इंदापुरे यांच्यासह कार्यकर्ते, वडार समाजबांधव उपस्थित होते. 


 
Top