धाराशिव / प्रतिनिधी-

भारतीय संविधानामध्ये व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले असून ते व्यक्ती केंद्रित आहे. तर संविधान हे सामुहिक दायित्व असून घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवनच सामाजिक दायित्वाचे आहे. त्यामुळे संविधानिक मूल्यांचे मूल्य समजल्याशिवाय दायित्वाची कामे करता येत नाहीत असे ठाम प्रतिपादन माजी सनदी अधिकारी तथा माजी समाज कल्याण आयुक्त ई.झेड. खोब्रागडे यांनी दि.२७ फेब्रुवारी रोजी केले.

उस्मानाबाद येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात असलेल्या सामाजिक न्याय भवनमध्ये प्रयास फाऊंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतीय संविधानाचे लाभार्थी आणि त्यांचे संविधानिक दायित्व या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, डॉ. सचिन शिंदे, फाऊंडेशनचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड, सचिव हुंकार बनसोडे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना खोब्रागडे म्हणाले की, भारतीय संविधान समजणे व वाचणे आवश्यक असून या संविधानामध्ये तथागत गौतम बुद्ध यांची न्याय, बंधुता व समता सामावलेली आहे. शिवाय आपल्या संस्कृतीशी निगडित असून देशातील विविधता देखील यामध्ये सामावलेली आहे. त्यामुळे संविधानाच्या माध्यमातून सर्व सामान्यांचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. तसेच सरकार सर्वसामान्य माणसांसाठी असते. परंतू एकीकडे सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून मागासवर्गीय समाजासाठी उपलब्ध करून दिला जाणारा निधी कमी केला जात आहे. तर दुसरीकडे मागच्या १० वर्षात याच विभागाचा ३० हजार कोटींचा निधी अखर्चित असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे नाली व गटारी आदींची कामे बघण्याचे काम आमदारांचे नसून अशी कामे सुरू असल्यामुळे विविध प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे विकासाच्या विविध योजना राबविण्यामध्ये सरकारचे संविधानिक दायित्व कमी पडत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. सामाजिक दायित्व समजण्यासाठी व न्यायिक हक्क, कर्तव्य, जबाबदारी हे सर्वांना समजावे यासाठी संविधान जागृती करणे आवश्यक आहे. त्यामुळे संविधानाच्या जागृतीसाठी ही मोहीम अशीच सुरु ठेवली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर मान्यवरांचा सत्कार सम्राट अशोकांची पहिला राजाज्ञा देऊन करण्यात आला. तसेच कार्यक्रमाची सांगता संविधान उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमाकांत गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन आशिष लगाडे यांनी व उद्देशिकेचे वाचन नालंदा जेटीथोर यांनी तर उपस्थितांचे आभार किशोर गवळी यांनी मानले. यावेळी रणजित कांबळे,अमोल गडबडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top