बहरलेली फळझाडे पाहून व्यक्त केले समाधान

धाराशिव / प्रतिनिधी-

भूम तालुक्यातील हाडोंग्री येथे ऑगस्ट महिन्यात लागवड केलेल्या वृक्षांची जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी यांनी पाहणी केली. बहरलेले फुले आणि फळांचे वृक्ष पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच वृक्षांची योग्य निगा राखल्याबद्दल ध्यानकेंद्राचे संचालक आदित्य बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांचे कौतुक केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून व बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांच्या पुढाकारातून हाडोंग्री येथील डोंगर भागातील शिवमंदिर, ध्यान केंद्र आणि भगवंत विद्यालयाच्या परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. यामध्ये विविध प्रकारच्या देशी, विदेशी प्रजातीच्या फळे आणि फुलझाडांचा समावेश आहे. योग्य प्रकारे जोपासना करण्यात येत असल्यामुळे सध्या हे वृक्ष बहरले आहेत. वेळच्यावेळी पाणी देऊन देखभाल करण्याचे काम ध्यान केंद्राचे संचालक श्री.आदित्य बाळासाहेब पाटील हाडाेंंग्रीकर हे स्वतः लक्ष घालून करत आहेत. या वृक्षांची सद्यस्थिती पाहण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी यांनी बुधवारी हाडोंग्री गावाला भेट दिली. सर्व वृक्षांची पाहणी करुन त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी लागवड केलेल्या वृक्षांची पाने आणि फुलांचा गुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांनी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीची मोहीम सुरू केलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून येरमाळा येथील येडेश्वरी मंदिर परिसर, हाडोंग्री, तसेच पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मदतीने पोलीस मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्हा पोलीस मुख्यालयात खास मियावॉकी उद्यानाची निर्मिती करण्यात आलेली असून व्यस्त कामकाजातूनही वेळ काढून ते स्वतः या वृक्षांची देखभाल करीत आहेत. मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यासाठी वृक्षप्रेमी व जनतेचा सहभाग देखील वाढविण्यासाठी ते सतत दक्ष आहेत.

 
Top