धाराशिव / प्रतिनिधी-

 धाराशिव नगर पालिकेतील गैरव्यवहार चव्हाटयावर आल्यानंतर लेखापाल सूरज संपत बोर्डे आणि प्रशांत विक्रम पवार यांना निलंबित करण्यात आले आहे. गंभीर बाब म्हणजे बोर्डे हे चतुर्थश्रेणी कर्मचारी असताना, तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांनी त्यांना लेखापालचा पदभार सोपवला होता.

 धाराशिव नगर पालिकेचे निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांनी आपल्या तीन वर्षाच्या कार्यकाळात अनेक गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे. येलगट्टे यांनी विविध बँक खात्यात नगर पालिकेच्या नावावर खाते उघडून अनेकांना धनादेश दिले होते. पैकी जवळपास पाचशेहून अधिक धनादेश बाऊंस झाले होते.

 नगर पालिकेच्या बँक खात्याची आणि वाटप करण्यात आलेल्या धनादेशाची माहिती आ. सुरेश धस यांनी मागितली असता, त्यांना माहिती देण्यात आली नाही. त्यानंतर आ. धस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता, जिल्हाधिकाऱ्यांनी येलगट्टे यांना माहिती विचारली असता, त्यांना अर्धवट आणि खोटी माहिती देण्यात आली. याप्रकरणी आ. धस यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला असता, नगर परिषद प्रशासन संचालनालयाने लेखापाल सूरज संपत बोर्डे आणि लेखापाल प्रशांत विक्रम पवार यांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे.

 धाराशिव नगर पालिकेत अनेक गैरव्यवहार झाले असून, निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांच्यावर एकूण पाच गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच लेखापाल सूरज संपत बोर्डे आणि प्रशांत विक्रम पवार यांच्यावर देखील गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

 नगर पालिकेतील गैरव्यवहारास मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे जितके जबाबदार आहेत, तितकेच तत्कालीन नगराध्यक्ष देखील जबादार असल्याने याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे..दरम्यान, निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांच्यावर आणखी गुन्हे दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले. 

 
Top