उमरगा/ प्रतिनिधी-

 प्लॉटमधील शेड समोर बाजेवर झोपलेल्या तरुणाच्या डोक्यात दगड घालुन अत्यंत क्रुरपणे खून केल्याची घटना तालुक्यातील चिंचोली (जहागीर) येथे रविवारी (ता. २६) सकाळी उघडकीस आली.

याबाबतची प्राथमिक माहिती अशी की, चिंचोली (जहागीर) येथील जेष्ठ नागरिक चंद्रकांत ममाळे जेमतेम शेती व्यवसाय व शेळीपालनावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, त्यांचा मुलगा शंकर ममाळे वय २८ वर्ष हा चिंचोली रस्त्यालगत असलेल्या देशमुख प्लॉटिंगमधील स्वतःच्या तात्पुरत्या शेडसमोर शनिवारी दी. २५ रात्री जेवण करून बाजेवर झोपला होता. शेडमध्ये सोयाबीन व बाजुला शेळ्या होत्या. मध्यरात्रीच्या दरम्यान झोपेत असताना अज्ञात व्यक्तींनी डोक्यात दगड, हत्याराचा वापर करून खून केला. दरम्यान रविवारी सकाळी दुसऱ्या वस्तीतील घरातुन वडिल, आई व भाऊ स्वतःच्या शेतातील ज्वारी कापणी साठी गेले. बराच वेळ होऊनही शंकर शेताकडे येत नसल्याने मोबाईलद्वारे संपर्क केल्यानंतर प्रतिसाद नव्हता. जेंव्हा घरातील कांही मुले शेडसमोर आले, तेंव्हा त्यांना रक्ताचे लोंढे दिसले. शंकरच्या भावाची पत्नीने घटनास्थळावर गेल्यानंतर खुनाचा प्रकार दिसुन आला.याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मनोजकुमार राठोड, सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश जाधवर घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.तर उस्मानाबाद येथून स्वान पथक पाचारण करण्यात आले होते.स्वान घटनास्थळी थोड्या अंतरावर जाऊन घुटमळले. खुन नेमके कोणत्या कारणाने झाला  याचा पोलिस शोध घेत असून तीघांना  ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.

 
Top