धाराशिव / प्रतिनिधी-

 ग्रामीण भागात सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र सुरू आहेत. या माध्यमातून आवश्यक असलेल्या आरोग्य सेवा पुरविल्या जातात. मात्र त्या ठिकाणी पिण्याचे पाणी व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धार्मिक कार्यक्रमात ज्याप्रमाणे आपण लोक वर्गणी देतो अगदी त्याप्रमाणेच आरोग्य मंदिरामध्ये आरोग्याबरोबरच सर्व प्रकारच्या दर्जेदार सेवा मिळाव्यात यासाठी लोकसहभाग देणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन ‌जिल्हा रुग्ण कल्याण समितीचे समन्वयक किशोर गवळी यांनी दि.२४ मार्च रोजी केले.

उस्मानाबाद येथील पत्रकार भवनमध्ये उस्मानाबाद तालुकास्तरीय आरोग्य जनसुनवाई कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी.के. ऐवळे, तेर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन.एस. मगरे, सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सावंत, ऍड. देविदास वडगावकर, पत्रकार रहीम शेख, मल्लिकार्जुन सोनवणे, हॅलो मेडिकल फाउंडेशनचे प्रकल्प संपर्क अधिकारी जावेद शेख आदी उपस्थित होते. पुढे बोलताना गवळी म्हणाले की, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रामध्ये कोणकोणत्या सोयी सुविधांची कमतरता आहे ? याची पूर्ण माहिती घेऊन त्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी व त्यावर देखरेख करण्यासाठी प्रत्येक आरोग्य व उपकेंद्रात कार्यरत असलेल्या जन आरोग्य समितीने त्या सुधारणा करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. तसेच कोणत्या आजारावर कोणती औषधे किंवा गोळ्या द्याव्यात हे त्या आजारानुसार डॉक्टर शिफारस करीत असतात. त्यामुळे रुग्णांनी देखील डॉक्टरांनी शिफारस केलेल्या गोळ्या किंवा औषध याचे वेळेवर सेवन करावे असे सांगितले. तर ऍड. देविदास वडगावकर म्हणाले की, जन सुनवाईच्या  माध्यमातून अडीअडचणी समजून घेता याव्यात यासाठी ग्रामस्थ व अधिकाऱ्यांनी थेट समोरासमोर संवाद करणे ही खरी लोकशाही असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच रहीम शेख म्हणाले की, आरोग्याच्या समस्या सावित्रीच्या लेकींनी मांडल्या तरच त्यावर पर्याय निघेल. विशेष म्हणजे महिलांनी आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाहीत असे धाडसाने सांगायला सुरुवात केली असून त्या समस्या दूर झाल्या पाहिजेत असे सांगितले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूर्वी महिला बोलायला घाबरत होत्या. शिकलेल्या महिला तोंडावरील बोट काढायला तयार नव्हत्या. मात्र आता महिला धाडसाने पुढे येत असून अशाच वेगवेगळ्या क्षेत्रातील समस्या सोडवून घेण्यासाठी महिलांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच अशोक सावंत म्हणाले की, आरोग्य क्षेत्रामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू झाल्यानंतर जनसुनवाही कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविले गेले. तर आरोग्य कर्मचाऱ्यांनी वेळेवर व आवश्यक त्या आरोग्य सुविधा उपलब्ध केल्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील सर्व महिला व बालकांना चांगल्या प्रमाणात आरोग्य सुविधा मिळू लागल्या आहेत. त्यामुळे माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ सी.के. ऐवळे व वैद्यकीय अधीक्षक डॉ एन.एस. मगरे यांनी उपस्थित नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे देत त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. प्रस्ताविकेमध्ये प्रबोध कांबळे यांनी या जन सुनवाई मागचा उद्देश व करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली. या जन सुनवाईमध्ये कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी मातांना खासगी रुग्णालयात पाठविण्यात येऊ नये, रक्त तपासणी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बाहेरील खाजगी लॅबच्या कर्मचाऱ्यांना परवानगी देण्यात येऊ नये, रिक्त असलेली वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात यावीत, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण घेऊन ३ टाक्यांची ऑपरेशन करावीत, जिल्ह्यातील बोगस डॉक्टर प्रॅक्टिस करत असून ती बंद करण्यात यावी आदीसह इतर विविध विषयावर चर्चा करीत नागरिकांनी मागणी केली. 

या जन सुनवाईमध्ये आळणी येथील दादासाहेब गायकवाड, कोंडचे उपसरपंच युवराज जाधव, बेंबळी येथील सारिका गवळी, शितल शितोळे, खेड येथील काकासाहेब लोमटे आदींसह इतरांनी सहभाग घेतला. प्रस्तावना जिल्हा फिल्ड सुपरवायझर अमोल ओव्हाळ, तालुका समन्वयक रमण गायकवाड, सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार जावेद शेख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अमृता रणदिवे, महादेवी रसाळ, पुष्पा बनसोडे, सारिका सोनटक्के आदींसह इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


 
Top