धाराशिव / प्रतिनिधी-

 ग्राहकांना हक्काची जाणीव व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. परंतु अजूनही पुरेशी जागरूकता ग्राहकांमध्ये आलेली दिसत नाही. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या हक्कासाठी जागरूक रहावे असे आवाहन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सदस्य न्यायाधीश मुकुंद सस्ते यांनी केले.

 जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त बुधवारी (दि.29) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ग्राहक जागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी  स्वाती शेंडे,  अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा सचिव विजयकुमार बंग, शरद वडवणकर ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य जिल्हा संघटक आणि प्रवासी महासंघ ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य रविशंकर पिसे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी कुलदिप कुलकर्णी,नायब तहसिलदार राजाराम केलूरकर, विशाखा समिती जिल्हाध्यक्षा  ज्योती सपाटे आदि उपस्थित होते

  न्या.सस्ते म्हणाले ,  प्रत्येक नागरिकाला सहा मूलभूत अधिकार आहेत. त्या अधिकाराबरोबर ग्राहकांनी आपल्या हक्कांविषयी माहिती घेऊन आपली फसवणूक होणार नाही, यासाठी जागरूक असले पाहिजे. कोणतीही वस्तू खरेदी करताना त्या वस्तूच्या गुणवत्तेची खात्री करावी. तरच आपली फसवणूक होणार नाही, असे त्यांनी सांगितले. बाजारपेठेतील विविध उदाहरणे देऊन  सखोल मार्गदर्शन केले.

 प्रास्ताविकात जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती  शेंडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश विशद केला  कार्यक्रमाला जिल्हा ग्राहक मंचचे सदस्य, विविध शासकीय विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.नायब तहसीलदार राजाराम केलूरकर  यांनी आभार मानले.


 
Top