उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उघड्या बोडक्या माळरानावर जीवाचं रान करून सोनं पिकविणऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी निसर्गाबरोबर आता वन्यप्राणीही लागले आहेत. यामुळे या भागातील शेतकरी जाम वैतागून गेले आहेत. दरम्यान, डुकरांनी आता इतर पिकांबरोबर द्राक्षबागाही मोडून काढण्याचा सपाटा लावला असून, तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील डॉ. रविराज गायकवाड यांच्या शेतातील 3 वेळा 79 द्राक्ष रोपे आणि त्या वेलींच्या वेळूच्या काठ्या या डुकरांनी मोडून व ओरबडून टाकल्या आहेत. वन विभागाकडे काही शेतकऱ्यांंनी तक्रारी केल्या तरी त्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची खंत जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

संपूर्ण तुळजापूर तालुक्यात आता द्राक्षबागा हजारो एकरावर विस्तारल्या असून,  डुकरांनी मात्र या बागायतदार शेतकर्‍यांना सळो की पळो करून सोडले आहे. या भागात एकतर अतिवृष्टी होवून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. महावितरणकडून रात्रीचा विद्युत पुरवठा, सतत डीपी जळणे अशा नाना संकटावर मात करीत न डगमगता शेतकरी  कंबर कसून जमिनीतून उत्पन्न काढतो.  मात्र आता या भागात शेतकऱ्यांसमोर डुकरांचे मोठे संकट उभे ठाकले असून, या भागात भुईमुगाच्या शेंगा, हरभरा, मूग, ज्वारी, ऊस आदी पिकांना या डुकरांचा प्रचंड त्रास होत आहे आणि आता तर चक्क द्राक्ष लागवड केल्यावर ती झाडेच उपटून टाकण्याचा आणि ओरबडून खाण्याचा नवा असूरी आनंद ही डुकरांची टोळी घेत आहे. डुकरांनी नुकसान केल्याने  तामलवाडीचे डॉ. गायकवाड यांनी त्यांच्या अडीच एकर बागेच्या शेतात चक्क तीन वेळा द्राक्ष वेली आणून नव्याने लागवड केली. यामुळे त्यांच्या रोपांचे, खते, औषधे, मजुरांचे हजारोंनी नुकसान झाल्याची त्यांनी खंत व्यक्त केली. आर्थिकदृष्टया संपन्न असून, मी वैतागून गेलो आहे.  दरम्यान, गरीब शेतकर्‍यांनी देणी काढून द्राक्षबाग लागवडीचा नाद केला आणि डुकरे असा हैदोस घालू लागले तर कसा हिशोब लागायचा. यामुळे वनविभागाने वेळीच या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी त्यांची मागणी आहे.

 

 
Top