उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

सासरच्या छळास कंटाळून एका ३२ वर्षीय विवाहितेने घरात विष प्राशन केले. उपचारादरम्यान उस्मानाबाद येथे दवाखान्यात मृत्यू झाला. याप्रकरणी छळ करणाऱ्या सासरच्या नवरोबासह सासरा, सावत्र सासू, दीर, चुलत सासरा व दीर यांच्याविरुद्ध माहेरच्यांनी तक्रार दिली. मात्र ती तक्रार दाखल करून न घेताच त्या पिडीत विवाहितेस

 उपचारासाठी दवाखान्यात आणणाऱ्या शेजाऱ्यांवर  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अजब व गजब प्रकार येरमाळा पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी केला आहे. त्यामुळे आई-वडिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे धाव घेत याप्रकरणी छळ करणाऱ्या नवरा, सासू-सासरे व दीर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे दि.१३ फेब्रुवारी रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, उस्मानाबाद तालुक्यातील राघुचीवाडी येथील रामराव श्रीपती चौरे यांची मुलगी कीर्ती हिचा २००६ मध्ये वाशी तालुक्यातील कडकनाथवाडी येथील दत्तात्रय भिमराव करडे याच्याबरोबर लग्न झाले होते. त्यापासून तिला दोन मुली व एक मुलगा अशी तीन आपत्ती आहेत. मात्र किर्ती करडे हिला सासरा यशवंत करडे, सावत्र सासू महानंदा करडे, सावत्र दीर दिगंबर करडे, चुलत सासरे बाबासाहेब करडे, चुलत दीर जगदीश करडे हे सतत छळ करीत होते. त्यामुळे २०१५ साली त्यांच्या त्रासाला कंटाळून कीर्तीने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाणे व उस्मानाबाद येथील महिला तक्रार निवारण केंद्रामध्ये संबंधित व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी तडजोडी आणती हे प्रकरण मिटविले गेले. मात्र पुन्हा त्यांनी तिचा छळ सुरू केल्याने या त्रासास कंटाळून कीर्तीने दि. २३ जानेवारी २०२३ रोजी विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान उस्मानाबाद येथील दवाखान्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास १०ते १५ वेळेस कीर्तीचे वडील रामराव चौरे हे गेले पोलीस निरीक्षक गोरे यांनी त्यांची कसलीही फिर्याद न घेता चौरे यांना दमदाटी करून तुला आत टाकू अशी धमकी देऊन हाकलून दिले. त्यानंतर कळंबचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना अर्ज देऊन भेट घेतली असता त्यांनी गोरे यांना सूचना केल्यानंतर देखील अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षकांकडे यासंदर्भात भेट घेऊन संबंधित छळ करणाऱ्या सासरच्या मंडळी विरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी चौरे यांनी केली आहे.


 
Top