उस्मानाबाद / प्रतिनिधी-
महसूल वाढविण्यासाठी गोरगरीब शेतकर्यांवर वरवंटा फिरवून रातोरात निर्णय घेत जिल्ह्यातील वर्ग एकमधील 80 टक्के जमिनी वर्ग दोन मध्ये घेण्याची बाब अन्यायकारक असून या प्रकरणात राज्याच्या महसूल मंत्र्यांनी दिलेल्या स्थगितीच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी 27 फेब्रुवारी रोजी आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन शेतकरी बचाव अराजकीय कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहे.
शेतकरी बचाव अराजकीय कृती समितीचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे, कार्याध्यक्ष सुधीर पाटील यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने सोमवारी (दि.13) जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. या निवेदनात म्हटले की, केवळ महसूल वाढावा म्हणून शेतकर्यांच्या जमिनी वर्ग एकमधून वर्ग दोन मध्ये करण्यात आल्या तो 29/05/2022 हा दिवस शेतकर्यांसाठी काळा दिवस ठरला आहे. दुसर्या महायुद्धात अणुबॉम्बमुळे जपानमधील हिरोशिमा व नागासाकी ही शहरे जशी उदध्वस्त झाली, त्याप्रमाणेच महसूलच्या वर्ग दोनच्या बॉम्बमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. या निर्णयामुळे आधीच वैतागलेल्या शेतकर्यांवर आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही. दरम्यान, महसूल मंत्र्यांच्या निदर्शनास आल्यानंतर नऊ महिन्यानंतर का होईना तत्कालीन जिल्हाधिकारी व तहसलिदारांच्या आदेश रद्द करत असल्याचा आदेश काढला. परंतु जिल्हा प्रशासनाकडून या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही किंवा त्यांना करायचीच नाही यासाठी वेगवेगळी कारणे सांगतआहेत. शेतकरी बरबाद झाला तरी चालेल, उद्ध्वस्त झाला तरी चालेल पण महसूल वाढला पाहिले या भूमिकेत जिल्हा प्रशासन दिसत आहे. त्यामुळे प्रशासन वेेगवेगळी कारणे सांगून महसूल मंत्र्यांच्या आदेशाची पायमल्ली करत आहे.
आम्हाला अजून आदेश मिळालेलाच नाही. , सोशल मीडियात व्हायरल झाला असताना आणि आमदारांनी स्वतः जाहीर केलेले असताना सुद्धा महसूल मंत्र्यांचा आदेश तुम्ही म्हणता तसा नाही काय? आमदारांनी पत्रकारांना दिलेले निवेदन खोटे आहे असे प्रशासनाला सुचवायचे आहे काय, असा सवालही निवेदनात करण्यात आला आहे. महसूल वाढावा म्हणून बळीराजावर अन्याय जगाच्या पाठीवर कोणत्याही लोकशाहीत झाल्याचे उदाहरण नाही. त्यासाठी प्रशासनाचे अभिनंदन करायचे की धिक्कार? असे निवेदना म्हणून महसूल मंत्र्यांच्या आदेशाचे पालन करुन वर्ग दोनमधील जमिनी वर्ग एकमध्ये करुन बळीराजाला दिलासा द्यावा, अशी मागणी समितीने केली आहे. निवेदनावर शेतकरी बचाव अराजकीय कृती समितीचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे, कार्याध्यक्ष सुधीर पाटील, रेवणसिद्ध लामतुरे, प्रा.अर्जुन जाधव, अभिजित पवार, संजय पवार, फेरोज पल्ला, उमेश राजेनिंबाळकर, अर्जुन पवार, दिलीप देशमुख यांच्यासह इनामी जमीनधारक, भूखंडधारक शेतकर्यांची स्वाक्षरी आहे.