नळदुर्ग / प्रतिनिधी-

 मुख्यालयी न राहता केवळ घरभाड्यापोटी मिळणारी रक्कम लाटण्यासाठी नळदुर्ग शहरासह तुळजापुर तालुक्यातील अनेक शिक्षकांनी आपण मुख्यालयी राहत असल्याचे बनावट प्रमाणपत्र दाखल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असुन. ज्यांना आपण आदर्श व्यक्तिमत्त्व समजतो त्या शिक्षकांडुन असा प्रकार घडावा ही शिक्षकीपेशेला काळिमा फासल्यासारखे आहे. त्यामुळे बोगस प्रमाणपत्र दाखल करणाऱ्या शिक्षकावर तर कारवाई झालीच पाहिजे मात्र असे बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या नगरपालिका अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामसेवकांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कडक कारवाई करून त्यांना अद्दल घडवावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधुन होत आहे.

 जे शासकीय कर्मचारी नोकरीच्या ठिकाणी (मुख्यालयी) राहत नाहीत व शासनाचे मुख्यालयी राहतो म्हणुन घरभाडे घेतात अशा सर्व शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ज्या सरकारी कर्मचाऱ्यांला घरभाडे घ्यायचे आहे त्यांना मुख्यालयी राहण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.मात्र शासनाच्या या आदेशाला केराची टोपली दाखविण्याचे काम सध्या अनेक सरकारी कर्मचाऱ्यांडुन होत आहे. आज अनेक ठिकाणी मुख्यालयी राहत असल्याचे बोगस प्रमाणपत्र दाखल करून घरभाडे घेत असल्याचे समोर येत आहे. 

  जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेऊन नळदुर्ग शहरातील मुख्यालयी न राहता ज्या शिक्षकांनी मी मुख्यालयी राहत असल्याचे प्रमाणपत्र दाखल केले आहे. त्या प्रमाणपत्राची ऑन द स्पॉट चौकशी करण्याचे आदेश द्यावेत. कांही महाभाग शिक्षकांनी घरमलकाची घरपट्टी भरुन त्यांच्याकडुन भाडेपट्टा लिहुन घेतला आहे. या भाडेपट्ट्याच्या आधारेच मुख्यालयी राहत असल्याचे प्रमाणपत्र नगरपालिकेडुन घेतले आहे. याठिकाणीही नगरपालिकेच्या संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांना चिरीमिरी देण्यात आली आहे. याची चौकशी होणे गरजेचे आहे.


 
Top