उस्मानाबाद/प्रतिनिधी

 प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी 11 फेब्रुवारी, 2023 रोजी उस्मानाबाद येथे लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.  या लोक अदालतीत कौटुंबिक न्यायालयातील 30 प्रकरणे तडजोडीच्या सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी 4 प्रकरणामध्ये लोक अदालतीच्या माध्यमांतून एकत्र संसार जुळण्यामध्ये कौटुंबिक न्यायालयास यश आले.

 वेळ, पैशाचा अपव्यय, कायद्यालयीन निकालाची वाट पहात होणारी मानसिक घुसमट यामुळे व्यक्तीच्या वैवाहिक, कौटुंबिक आयुष्यावर परिणाम तर होतोच शिवाय नकळतपणे व्यक्तीच्या वैयक्तीक, सामाजिक जीवनावर देखील त्याचा विपरीत परिणाम होत असतो. हा वाद संपवावा आणि वादाचे रुपांतर संवादात होवून कौटुंबिक आनंद अधिकाधिक वृध्दींगत कसा करता येऊ शकतो या बद्दल कौटुंबिक न्यायालयात समुपदेशनाच्या माध्यमातून घटस्फोट टाळून संसार परत सुरु करण्यासाठी प्रकरण लोक न्यायालयात तडजोडीसाठी पाठविण्यात आली.

 एका प्रकरणात नवरा बायकोच्या शुल्लक वादामध्ये आपापसात भांडणे वाढत गेली आणि उभय पक्षकारांनी एका 7 वर्षाचा मुलगा आणि 3 वर्षाच्या मुलीचा ताबा मिळविण्यासाठी दावा दाखल केला होता. कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश रुपाली मोहिते यांच्या समोर हे प्रकरण सुनावणीसाठी आल्यानंतर निरागस मुलांचा ताब्याविषयी विचार करताना मुलांना आई किंवा वडील यापैकी एकाचेच प्रेम न मिळता आई वडील एकत्र आले तर मुलांना दोघांचे प्रेम मिळेल आणि त्यांची मानसिक, शारिरीक शैक्षणीक वाढ व विकास योग्य पध्दतीने होईल यावर न्यायालयात समुपदेशनाच्या माध्यमातून आणि न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली विवाह समुपदेशक यांनी प्रयत्न केला. त्यात कौटुंबिक न्यायालयास यश येवून नवरा बायकोनी एकत्र येण्याचा विचार दाखविल्यामुळे त्या निरागस मुलांच्या चेहऱ्यावरती हसु फुलले आणि या प्रकरणात लोक अदालतीत तडजोड होऊन नवरा बायको एकत्र आले.

 
Top