उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रविवारी (दि. (१९) आग्रा किल्ल्यातील दिवाण- ए- आममध्ये साजरी करण्यासाठी अखेर पुरातत्त्व विभागाने मंजुरी दिली असून, त्यामुळे या वर्षीची शिवजयंती येथील आग्रा किल्ल्यात मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी दिली.

 छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य स्वाभिमान जिथे तळपला व तत्कालीन महाशक्ती असलेल्या मुघल साम्राज्याच्या विरोधात जनमानसात आत्मविश्वास निर्माण झाला त्या आग्रा किल्ल्यात १९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता शिवजयंतीचा कार्यक्रम रंगणार आहे.

 आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यासाठी पुरातत्त्व विभागाने प्रारंभी परवानगी नाकारली होती, मात्र बुधवारी सदर परवानगी देण्यात आली,अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान फाउंडेशन आयोजित करत असलेल्या या शिवजयंती उत्सवासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही उपस्थिती राहणार आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा वेध घेणारा भव्य असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार असून, यावेळी आकर्षक फटाक्यांची आतषबाजीही करण्यात येणार आहे.

 छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार देशभरातील तरुणांमध्ये जावेत, यासाठी जयंती साजरी करण्यात येणार आहे. छत्रपती  शिवाजी महाराज हे समाजाला राष्ट्रीय पातळीवर प्रोत्साहन देणारे महापुरुष आहेत व त्यांच्या विचारांचा प्रसार हा देशभर व्हावा, याच भावनेने आग्रा येथे शिवजयंती साजरी होत आहे, या विशेष कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सरकार सह-आयोजक असेल तर परवानगी द्यायला हरकत नाही अशी भूमिका दिल्ली उच्च न्यायालयाने मांडली होती. त्यानुसार राज्य सरकारही सह- आयोजक असणार आहे.

 देशाच्या इतिहासात प्रथमच असा सोहळा साजरा होत आहे या विशेष सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल केंद्र सरकार,आयोजक तसेच उत्तर प्रदेश सरकार व महाराष्ट्र सरकारचे भारतीय जनता पार्टी धाराशिव यांच्यावतीने अभिनंदन


 
Top