धाराशिव / प्रतिनिधी-

धाराशिव तालुक्यातील तावरजखेडा येथील ग्रामपंचायतअंतर्गत विविध विकासकामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी वारंवार निवेदन देऊन, आंदोलन करुनही गटविकास अधिकार्‍यांकडून दखल न घेतल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य समाधान फेरे यांनी सोमवार (दि.27) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.  तक्रारीनंतर काही प्रकरणात भ्रष्टाचाराची मोघम चौकशी करुन भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोपही श्री.फेरे यांनी केला आहे.

 ग्रामपंचायत सदस्य समाधान फेरे यांनी ग्रामपंचायतअंतर्गत झालेल्या जुन्या दलित वस्तीमधील समाजमंदिर, गावांतर्गत सिमेंट रस्ते, शौचालय बांधकाम यासह विविध विकासकामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना निवेदन दिले होते. या प्रकरणात माहिती देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याने माहिती अधिकाराखाली अर्ज दिल्यानंतरही वेळेत माहिती मिळाली नाही.  दरम्यान, जुन्या दलित वस्तीमधील समाजमंदिराचे बांधकाम आणि गावांतर्गत सिमेंट रस्ताकामाच्या चौकशीसाठी बांधकाम उपविभागाचे तांत्रिक अधिकारी 11 फेब्रुवारी 2023 रोजी चौकशीसाठी आले असताना नेमके तक्रारदारास कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. भ्रष्टाचाराशी संबंधित विद्यमान सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व मोजमाप पुस्तिकेत नोंद करणारे अभियंता यांना बोलावून मर्जीतील नागरिकांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. चौकशी पूर्ण झाल्यानंतर शेवटी तक्रारदाराला बोलावून घेतल्यामुळे या कामात झालेला भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालून प्रशासनाची दिशाभूल केली जात असून या कामाची पुन्हा चौकशी व्हावी अशी मागणी फेरे यांनी केली आहे.

 त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावातील शौचालय बांधकामाच्या लाभार्थ्यांची यादी पंचायत समितीकडून देण्यास टाळाटाळ केली जात आहे.पाच महिन्यापासून वारंवार मागणी करुन देखील यादी उपलब्ध करुन दिली जात नसल्यामागचे कारण काय? असा सवाल श्री.फेरे यांनी केला आहे. ग्रामपंचायतअंतर्गत राष्ट्रीय पेयजल योजना, एमआरईजीएस अंतर्गत विहिर व इतर कामे तसेच विविध योजनांमधून खरेदी केलेल्या पाणीपुरपठा पंप, 14 आणि 15 व्या वित्त आयोगांतर्गत कामे पूर्ण करण्यात आली, परंतु तांत्रिक बाबी तपासल्या गेल्या नसल्याचे तक्रारीमध्ये श्री. फेरे यांनी म्हटले आहे.

 
Top