धाराशिव / प्रतिनिधी-

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कथीतरीत्या गुन्ह्यात अटक केल्याच्या निषेधार्थ  आम आदमी पार्टीच्या वतीने सोमवारी (दि.27) जोरदार निदर्शने करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कार्यकर्त्यांनी मोदी-शहा आणि भाजपा सरकारच्या दडपशाही धोरणाचा निषेध करून प्रधानमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.

 जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रधानमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारच्या वतीने देशात अत्याधुनिक शैक्षणिक क्रांतीची सुरुवात करून सर्वसामान्य नागरिकांच्या पाल्यांना दर्जेदार व आदर्श शिक्षणाची ओळख करून देणारे उपमुख्यमंत्री तथा शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयमार्फत निराधार व खोट्या गुन्ह्यात अटक करून जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्यावरील आरोप मागे घेऊन त्यांची तात्काळ मुक्तता करावी, अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या आंदोलनात आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष राहुल माकोडे, सचिव महेबूब शेख, उपाध्यक्ष तानाजी पिंपळे, युवा जिल्हाध्यक्ष आकाश कावळे, मुन्ना शेख, राजपाल देशमुख, दत्ता कांबळे, अभिजित देवकुळे, गोकुळ काळे, सौ. सुरेखा यादव, संदीप अंकुशराव, संजय दणाणे, अंकुश चौगुले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top