भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील  यांनी केली सचिवाकडे तक्रार 

 उस्मानाबाद/प्रतिनिधी

 जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या निधी वाटपावरून पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत व भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या सन 2022-23 निधी वाटपाच्या प्रस्तावित कामात इतर मतदार संघाच्या तुलनेत भुम परंडा मतदार संघाला झुकते माप देण्यात आल्याचा आरोप करीत असमतोल निधी वाटपाबाबत भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या विरोधात नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. 

   असमतोल दूर करण्यासाठी नियोजन समितीचे सचिव तथा जिल्हाधिकारी यांना योग्य त्या सूचना कराव्यात अशी मागणी केली आहे. त्यानुसार उपसचिवानी जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र देत प्रस्तावित कामांची माहिती मागवली आहे.पालकमंत्री डॉ सावंत यांनी मंजुरीसाठी शिफारस केलेल्या कामाच्या यादीवर आमदार राणा पाटील यांनी आक्षेप घेतला आहे.   जास्तीत जास्त निधी नेण्याच्या मनसुब्याला या तक्रारीने खो बसणार आहे. जिल्ह्यातील सर्व मतदार संघात नियमानुसार समसमान निधी वाटप करण्यासाठी आमदार राणा पाटील यांनी आवाज उठवीत पुढाकार घेतला आहे. उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा या मतदार संघाना कसे डावलण्यात येत आहे त्याची तुलनात्मक आकडेवारी आमदार पाटील यांनी तक्रारी सोबत दिली आहे.

 भाजपाचे खच्चीकरण 

केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असली तरी उस्मानाबाद जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून बाळासाहेबांची शिवसेना गटाचे प्रा. तानाजी सावंत हे आहेत. भाजपाचे आमदार माजी मंत्री असले तरी त्यांचा अद्याप मंत्रीमंडळात समावेश झाला नाही, त्यामुळे उस्मानाबाद जिल्हयावर सध्या मंत्री सावंत यांचेच आदेश चालतात सार्वजनिक कार्यक्रमात पालकमंत्री सावंत सक्रीय झाले आहेत, त्यामुळे भाजपाच्या  नेत्यांना कांही प्रमुख  कार्यक्रमात डावलेले जात असल्याने भाजपाचे हे खच्चीकरण असल्याचे मानले जात आहे.  

 
Top