तुळजापूर/ प्रतिनिधी-

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे मराठी भाषा गौरव दिन आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवि वि.वा.शिरवाडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.सदर प्रसंगी मराठी विभागात कार्यरत प्रा.सोहन कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वरील प्रतिपादन केले,पुढे ते म्हणाले की,कवि कुसुमाग्रज यांच्या लेखणीतून जे अजरामर मराठी साहित्य निर्माण झाले त्यामुळे मराठी साहित्य विश्वात भाषेचा एक नवप्रवाह प्रवाहित झाला,काव्य निर्मिती ही जरी एकांतात   होत असली तरी ती सर्वसामान्य माणसाच्या भावनेला आणि संवेदनशीलतेला मार्ग दाखवणारी असते.कवि कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो, नटसम्राट, एक होती वाघीण,नाटक बसते आहे,दिवाणी दावा,जेथे चंद्र उगवत नाही,वीज म्हणाली धरतीला ही त्यांची गाजलेली नाटके , यांच्या माध्यमातून मराठी भाषेला जनसामान्यांच्या मनात एक आदराचे स्थान निर्माण करुन दिले, कुसुमाग्रज हे आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठी साहित्य विश्र्वातील अग्रगण्य लेखक आहेत.त्यांच्या विशाखा काव्य संग्रहामुळे भारतीयांच्या एका पिढीला स्वातंत्र्याच्या कार्यात सामील होण्यासाठी प्रोत्साहित केले,ही फक्त मराठी भाषेची आणि ऊर्जेची किमया होती,मराठी माणसाने माय मराठीचे अस्तित्व कालानुरूप जपण्याची गरज त्यांनी शेवटी व्यक्त केली.यावेळी मराठी विभाग प्रमुख डॉ एस एम देशमुख, ग्रंथपाल प्रा.दिपक निकाळजे यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विवेकानंद चव्हाण यांनी केले तर आभार प्रा आशपाक आतार यांनी मानले

 
Top