धाराशिव / प्रतिनिधी-

औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यातील पॅंथर व आंबेडकरी जनतेचा बुलंद आवाज, अभ्यासू नेतृत्व यशपाल प्रल्हादराव सरवदे (वय ६६) यांचे दि.२६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले. उस्मानाबाद येथील स्मशानभूमीत सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर बौद्ध धम्म पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. 

यावेळी भन्ते सुमेधजी नागसेन, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, काँग्रेसचे विश्वासआप्पा शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा.डॉ. संजय कांबळे, लातूरचे माजी उपमहापौर चंद्रकांत चिकटे, मोहन माने, माजी नगराध्यक्ष संपत डोके, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ, ॲड. सुदेश माळाळे, पत्रकार दिलीप पाठक नारीकर, भाजपचे रामदास कोळगे, छात्रभारतीचे प्रा अर्जुन जाधव, प्राचार्य कमलाकर कांबळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवदास कांबळे, माजी नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत प्रा अनंत लांडगे आदींसह विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते.

यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करीत सर्व दे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई, बहीण असा परिवार आहे. त्यांचे ज्वलंत कर्तृत्व जनमानसात कायम स्मरणात राहील असेच आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा, दिन, दलित, शोषितांच्या अस्मितेचा लढा. विद्यापीठ नामांतराचा ठराव तत्कालीन विधानसभेत सर्वानुमते मंजूर होऊनही, त्याची अंमलबजावणी केली जात नव्हती. त्यासाठी आंबेडकरी जनतेला निकराची लढाई लढावी लागली. तेंव्हा नामांतर का होत नाही असा सवाल करत, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, कडोकोट बंदोबस्तातील प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर झेप घेणारा तत्कालीन निडर पँथर होते यशपाल सरवदे. तेंव्हाचे मुख्यमंत्री होते खुद्द शरद पवार. यशपाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर झेप घेऊन त्यांना हा जाब विचारला होता. सरकारी यंत्रणेची यामुळे अक्षरशः भंबेरी उडाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री तेंव्हा सोलापूर दौऱ्यावर होते. 

उस्मानाबाद जिल्हा म्हणजे आत्ताच्या लातूर जिल्ह्याचाही त्यात समावेश होता. या परिसरातील आंबेडकरवादी जनतेत सरकारविरोधी असंतोष होता. त्याचे कारण होते, विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा ठराव होऊनही त्याची अंमलबजावणी सरकार करत नाही. या अन्यायाविरुद्ध सनदशीर मार्गे आक्रमक लढा उभारणारे अग्रणी नेतृत्व म्हणजे यशपाल सरवदे होय. कणखर, अभ्यासू आणि आक्रमक नेतृत्व म्हणून त्यांची राज्यात ख्याती होती. उस्मानाबाद नगरपालिकेचे उपनगराध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

१९९७ साली त्यांनी ऐतिहासिक अशी धम्म परिषद उस्मानाबाद येथे घेतली होती. स्थळ होते आत्ताचे जिल्हा क्रीडा संकुल. सलग दोन दिवस येथे अक्षरशः लोकांची रीघ लागली होती. शुभ्रवस्त्र परिधान केलेली असंख्य जनता ठिकठिकाणाहून सहभागी झाली होती. देदीप्यमान अशा पद्धतीने झालेल्या या धम्म परिषदेने लोकांचे डोळे दिपले होते. सलग दोन दिवस शहरातून निघालेल्या धम्मयात्रा व धम्म देसनेने लोक तृप्त झाले होते. अशी धम्म परिषद पुन्हा झाली नाही. त्या आठवणी लोक आजही विसरलेले नाहीत. तसेच भारतीय संविधानाची प्रास्ताविका भीमनगरमधील क्रांतिचौकात व नगर पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बसविण्यात त्यांचे अविस्मरणीय योगदान आहे.

त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख खूप मोठा आहे. त्यांच्या अविस्मरणीय आठवणी कायम स्मरणात राहतील.

 
Top