जळकोट / प्रतिनिधी 

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या वतीने विविध सांघिक व वैयक्तिक स्पर्धा जळकोट बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी मनोहर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 22 व 23 जानेवारी 2023 रोजी शालेय स्तरावर घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये खो-खो, कबड्डी, धावणे, गोळा फेक, लांब उडी आदी मैदानी स्पर्धेबरोबरच सामान्य ज्ञान व प्रश्नमंजुषा अशा बौद्धिक स्पर्धाही घेऊन विद्यार्थ्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास  साधण्याचे काम या स्पर्धांमधून करण्यात आले. सदर स्पर्धा ह्या इयत्ता पाचवी ते आठवी व नववी ते दहावी या दोन गटात घेण्यात आल्या. संबंधित स्पर्धेचा निकाल प्रजासत्ताकदिनारोजी घोषित करण्यात आला होता. सदर  सामान्य ज्ञान स्पर्धेत पाचवी ते आठवी गटातून इयत्ता सहावी मधील विद्यार्थी चि. राजहंस संजय रेणुके याने प्रथम क्रमांक मिळवून बाजी मारली. तर ऋषिकेश सुरवसे इयत्ता आठवी याने द्वितीय तर इयत्ता आठवी मधीलच कु. प्रतीक्षा मर्डे व कु. तनुजा चव्हाण यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळवला. दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी गुणवंतांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे  वितरीत करण्यात आली. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, जळकोटचे सरपंच अशोकराव कदम ( पाटील ), ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र कदम,  शाळाव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष माळगे, उपाध्यक्ष खंडू चंदे, मुख्याध्यापक संतोष सारणे, सहशिक्षक प्रदिप तरमोडे, वैभव पटवारी, महेंद्र शिंदे, गोपाळ बंदपट्टे, सहशिक्षिका सौ. पुष्पलता कांबळे, सौ. सारिका भोसले, सौ. श्रीदेवी घोडके, अंगणवाडी सेविका सौ. सत्यशीला कदम, सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका श्रीमती सरोजिनी सुरवसे, माजी सैनिक संजय स्वामी आदि मान्यवरांसह विद्यार्थी, पालक बहुसंख्येने उपस्थितीत होते.  

 
Top