उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 बाळासाहेब शिवसेनेचे नेते आनंद सतीशराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्यावतीने उस्मानाबाद येथे दि.११ ते १४ जानेवारी असा ४ दिवस रोजगार मेळावा आयोजित केला आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार असलेल्या ७०० युवक नोकरी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी यामध्ये सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसएससीआय सेक्युरिटी लि. कंपनीचे प्रशिक्षक रणजीत ठोंबरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.१० जानेवारी रोजी केले.

येथील हॉटेल पुष्पक पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आनंद पाटील, लखन गायकवाड, सुमित काजले, सुनील चव्हाण, जावेद शेख, प्रशांत साठे, रतन बनसोडे, रॉबिन बगाडे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ठोंबरे म्हणाले की, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कार्य करीत असलेले आनंद पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मित्र परिवाराच्यावतीने हा मेळावा आयोजित केला आहे. दि.११ ते १४ या कालावधीमध्ये उस्मानाबाद शहरातील बार्शी रोडवरील साईराम नगर येथे सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत भारत सरकारच्या पसारा ऍक्ट २००५ नुसार एसआयएस मानांकन प्राप्त एसएससीआय सेक्युरिटी लि. कंपनीमध्ये‌ ही मेगा भरती करण्यात येणार आहे. यामध्ये सुरक्षा जवान, सुपरवायझर, सेक्युरिटी गार्ड, बाऊन्सर व बॉडीगार्ड आदी पदांचा समावेश आहे. तसेच २१ वर्षे पूर्ण व ३६ वर्षाच्या आतील असावा तर तो इयत्ता १० पास/नापास युवक आवश्यक असून त्यांना वयाच्या ६५ वर्षापर्यंत नोकरी देण्यात येणार आहे. त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, जन्म दाखला आदी कागदपत्रांसह उंची १६८ सेंमी असणे आवश्यक आहे. तर निवड झालेल्या उमेदवारांना पुणे येथे एक महिन्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच नियुक्तीपत्र दिल्यानंतर त्यांना सुरुवातीस १५ ते २० हजार रुपये पगार, पी.एफ., संपूर्ण परिवारासाठी मेडिकल, ग्रॅज्युटी, बोनस, ग्रुप इन्शुरन्स, जवानांसाठी बॅरेक आदी सुविधा देण्यात येणार असल्याचे ठोंबरे यांनी सांगितले.


 
Top