उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यातील 2005 पूर्वी नियुक्त व 2005 नंतर अनुदानावर आलेल्या सर्व शिक्षकांनी शिक्षक मतदार संघ निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊन कोणत्याही उमेदवाराला मतदान न करण्याचा संकल्प केला आहे. 2014 पासून फक्त उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षकांची जीपीएफ कपात बंद असून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना वेगळा न्याय व उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षकांना वेगळा न्याय का? असा सवाल शिक्षण संघर्ष संघटना जुनी पेन्शन कोअर कमिटीने उपस्थित केला आहे.

 सन 2005 पूर्वी नियुक्ती झालेली असताना फक्त विनाअनुदानित तत्त्वावर असल्यामुळे पेन्शनचा नैसर्गिक न्याय्य हक्क शिक्षकांना नाकारला गेल्याची चीड शिक्षक बांधवांमध्ये आहे. शिक्षकांच्या प्रश्नाविषयी सत्ताधारी व विरोधकांनी कोणतेही काम केलेले नसून आमच्या तोंडाला फक्त पाने पुसण्याचे काम केले असल्याची पीडित शिक्षकांची भावना आहे. मुंबई येथील आझाद मैदानावर शिक्षकांनी 4 महिने 11 दिवस आंदोलन केले. मुंडन आंदोलन, गोंधळ आंदोलन, दंडवत आंदोलन, शिक्षण मंत्र्यांच्या बंगल्यासमोर आंदोलन अशा प्रकारे आंदोलन करुन सरकारचे लक्ष वेधून घेतल्यानंतरही न्याय मिळाला नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील जयकुमार पाटील (उस्मानाबाद), जमाल पापा शेख (तुळजापूर), गायकवाड आबा (उमरगा), श्री. डोईफोडे श्री. खैरमोडे (वाशी) या सर्व सेवानिवृत्त शिक्षक बांधवांनी ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता तब्बल 4 महिने 11 दिवस आंदोलन केले. शेवटी उकड्याचा त्रास सहन न झाल्यामुळे आंदोलक बांधवाला वेदना होत असल्यामुळे व शासन दखल घेत नसल्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलन काळात कोणीही शिक्षकांच्या भेटीला आले नाही. सेवानिवृत्तीनंतर कोणतीही पेन्शन नसल्यामुळे शिक्षकांसमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येणार्‍या 30 तारखेला कोणत्याही शिक्षकाने सरकारने लेखी आश्वासन दिल्याशिवाय मतदानावरचा बहिष्कार मागे घेतला जाणार नाही असे शिक्षण संघर्ष संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. याविषयीचे निवेदन पत्रकाद्वारे सर्व संबंधित उमेदवार, शासन, आमदार यांना देण्यात आले आहे.


 
Top