नळदुर्ग / प्रतिनिधी-

 नळदुर्ग- अणदुरकरांनी खंडोबा यात्रेत मान पान न पाहता खंडोबा देव हा आपला देव आहे असे समजुन यावर्षीची खंडोबाची यात्रा भव्य दिव्य स्वरूपात साजरी व्हावी यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन तहसिलदार सौदागर तांदळे यांनी नळदुर्ग (मैलारपुर) येथे यात्रेनिमित्त नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजीत केलेल्या बैठकीत बोलतांना केले आहे.

        नळदुर्ग (मैलारपुर) येथील प्रसिद्ध व ऐतिहासिक श्री खंडोबाची यात्रा दि.६ जानेवारी रोजी भरत आहे. दोन वर्षानंतर यावर्षी खंडोबाची यात्रा भरत आहे. त्यामुळे ही यात्रा यावर्षी मोठ्या संख्येने भरणार आहे. नगरपालिका प्रशासन, पोलिस प्रशासन व मंदिर प्रशासनाकडुन यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यात्रेसंदर्भात जी नियमावली तयार करण्यात आली आहे त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या वतीने दि.२ जानेवारी रोजी मैलारपुर येथील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार सौदागर तांदळे हे होते तर नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार,एमएसईबीचे अभियंता श्री गायकवाड,वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार, डॉ. मेहताब शेख, परिवहन महामंडळाचे वाहतुक नियंत्रक महेश डुकरे, मंडळ अधिकारी जयंत गायकवाड, अणदुरचे माजी सरपंच धनराज मुळे, मानकरी श्रीमंत मुळे, सुहास पाटील, कमलाकर चव्हाण, मनोज मुळे, अमित मुळे,संतोष पुदाले,कल्याणी मुळे, धनाजी चव्हाण, बालाजी कुलकर्णी, प्रविण घोडके, मंदिर समितीचे उपाध्यक्ष अविनाश मोकशे, सरदारसिंग ठाकुर, ज्ञानेश्वर घोडके, शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, उत्तम बनजगोळे, लतिफ शेख, माजी नगरसेवक सुधीर हजारे, संजय विठ्ठल जाधव, यांच्यासह नळदुर्ग व अणदुर येथील खंडोबाचे मानकरी, पुजारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          प्रारंभी मंदिर देवस्थान समितीच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यानंतर बोलतांना तहसिलदार सौदागर तांदळे यांनी म्हटले की, खंडोबा यात्रेत येणाऱ्या भाविकांना याठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नळदुर्ग नगरपालिका, मंदिर समिती तसेच नळदुर्ग--अणदुरकरांनी प्रयत्न केले पाहिजे प्रशासन आपल्या परीने यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत.खंडोबा देव हा आपला आहे असे समजुन नळदुर्ग--अणदुरकरांनी यात्रेचे नियोजन केले पाहिजे. लहान--सहान कारणावरून वाद न करता यावर्षीची यात्रा भव्य--दिव्य प्रमाणात कशी पार पडेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. यात्रेत येणाऱ्या भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आताच नियोजन करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मंदिर परीसरात जी दुकाने थाटली जातात ती रस्ता सोडुन व्यापाऱ्यांनी आपली दुकाने लावावीत. जेणेकरून यात्रेकरूंना त्रास होणार नाही. यात्रा व्यवस्थित व शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे असेही तहसिलदार सौदागर तांदळे यांनी म्हटले आहे.

         यावेळी बोलतांना सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी म्हटले की यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी पोलिस यंत्रणेने सर्व तयारी केली आहे. यात्रेत एकही अवैध धंदा सुरू होणार नाही. यात्रेत येणाऱ्या भाविकांना कुठल्याच प्रकारचा त्रास न होता त्यांना खंडोबाचे दर्शन व्हावे यासाठी उपाययोजना केल्या आहेत. यावर्षीच्या खंडोबा यात्रेत एकेरी वाहतुक सुरू करण्यात येणार असुन नळदुर्ग मार्गे मैलारपुरात येणाऱ्या रस्त्यावरून फक्त मंदिराकडे येणारी वाहतुक सुरू राहील तर बाहेर जाण्याचा मार्ग हा बायपास रस्ता असणार आहे. यात्रा कालावधीत हे दोनच रस्ते वाहतुकीसाठी सुरू राहतील इतर रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. यात्रेत हुल्लडबाजी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी यात्रेकरू, भाविक व नागरीकांनी सहकार्य करावे असेही यावेळी सिद्धेश्वर गोरे यांनी म्हटले आहे.

        यावेळी नगरपालिकेचे मुनिर शेख,कमलाकर चव्हाण, ज्ञानेश्वर घोडके, धनराज मुळे, संतोष पुदाले यांनीही यात्रेसंदर्भात आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार भैरवनाथ कानडे यांनी केले तर आभार मंदिर समितीचे उपाध्यक्ष अविनाश मोकाशे यांनी मानले.


 
Top