उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देण्यासह क्रीडा जगतात एक वेगळे वलय प्रस्तापित करण्यासह अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जेदार खेळाडू देणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यात भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याची मागणी जिल्ह्यातील विविध एकविध क्रीडा संघटनेच्या वतीने भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव चंद्रजीत जाधव यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्याकडे केली आहे.

उस्मानाबाद येथील राष्ट्रीय खो खो पटू निकिता पवार यांच्या घरी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी सदिच्छा भेट दिली होती यावेळी सदरील निवेदन डॉ चंद्रजीत जाधव यांनी दिले, यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार अभिमन्युव पवार, भारतीय जनता पार्टी, ज्युदो व सायकलिंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, उस्मानाबाद जिल्हा धनुर्विद्या व ज्युदो संघटनेचे सचिव प्रवीण गडदे, जिल्हा खो खो संघटनेचे सचिव प्रवीण बागल, तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, ज्युदो कोच कैलास लांडगे, राष्ट्रीय खो खो पटू रोहिणी आवारे व निकिता पवार सह जिल्ह्यातील खो खो, आर्चरी, ज्युदो व स्केटिंग आदी क्रीडा प्रकारांचे राष्ट्रीय खेळाडूंची प्रमुख उपस्तीथी होती.

मागासलेला जिल्हा म्हणून ओळख असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यास एक वेगळी ओळख करून दिली ती जिल्ह्यातील खेळाडूंनी. कसल्याही सोइ सुविधेविना राज्य, राष्ट्रीयच नव्हे तर अगदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील मैदानही दणाणून सोडणाऱ्या जिल्ह्यातील खेळाडूंची कामगिरी नेहमीच अव्वल राहिलेली आहे. 

महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राला नवनिर्मिती करण्यासाठी राज्यात अधिकाधिक साई केंद्रे सुरू केले तरच भारताला आशियाई क्रीडा स्पर्धा आणि ऑलिम्पिकमध्ये अधिकाधिक पदके मिळवून देणे शक्य होईल. उस्मानाबाद जिल्ह्याचे वातावरण खेळासाठी अतिशय चांगले असून साई मार्फत स्पर्धापूर्व प्रशिक्षणाची व्यवस्था करणे शक्य होईल आणि ते केवळ राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील सर्वोत्तम खेळाडूंसाठी फायदेशीर ठरेल. विशेष म्हणजे भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे नवे केंद्र उस्मानाबाद येथे उभारल्यास उस्मानाबादच्या विकासात भर पाडण्यासह जिल्ह्याचा मागासलेपणा दूर होण्यास साईचे हे केंद्र महत्वपूर्ण असल्याने जिल्ह्यातील खेळाडू व क्रीडा संघटनेची मागणी आहे.

क्रीडा संघटनांकडून निवेदने….

जिल्ह्यातील विविध एकविध क्रीडा संघटनेकडूनही क्रीडा सोयीसुविधा निर्माण होन्याच्या दृष्टीने केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमारजी मिश्रा यांना निवेदने देण्यात आली, यात जिल्हा खोखो संघटनेच्या वतीने इनडोअर खो खो हॉल, जिल्हा ज्युदो संघटनेने इनडोअर ज्युदो हॉल व मॅट, जिल्हा स्केटिंग संघटनेने स्केटिंग रिंक व इनलाईन हॉकी ग्राउंड तसेच जिल्हा आर्चरी संघटनेच्या वतीने अत्याधुनिक सोइ सुविधांसह आर्चरी प्रशिक्षण केंद्र उभारण्याची मागणी केली आहे.

 
Top