उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या धाराशिव शाखेच्या वतीने आज रथसप्तमीनिमित्त सामूहिक सुर्यनमस्कार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री. तुळजाभवानी स्टेडीयमवर आयोजित या कार्यक्रमात शहरातील सहा शाळांतील 755 विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार घातले. शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कुल, आर्य चाणक्य विद्यालय, छत्रपती शिवाजी विद्यालय, भारत विद्यालय, मराठी कन्या  विद्यालय या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.  

प्रारंभी पतंजली योग समितीचे राज्य प्रभारी नितीन तावडे आणि राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य देविदास पाठक यांच्या हस्ते आणि विवेकानंद संस्कार केंद्र धाराशिवचे प्रमुख शामराव दहिटणकर यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामूहिक सुर्य नमस्कार कार्यक्रम प्रमुख शुभम शेरखाने यांनी केले. यावेळी बोलताना नितीन तावडे यांनी विवेकानंद  केंद्राच्या या उपक्रमाचे कौतुक करून दररोज सुर्यनमस्कार घालने किती गरजेचे आहे हे स्पष्ट केले. यानिमित्ताने सूर्यनमस्काराचे महत्त्व विशद करण्यात आले. तसेच संक्रमण काळातील रथसप्तमी सणानिमित्त प्रकटणारे सूर्याचे तेज स्वामी विवेकानंदांच्या ज्ञानतेजाप्रमाणे विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.  

सिनेट सदस्य देविदास पाठक यांनी स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत उभा करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे त्यासाठी मन आणि शरीर बळकट करण्यासाठी दररोज सूर्यनमस्कार घालणे आवश्यक असल्याचे सांगितले.  

या कार्यक्रमासाठी कार्यक्रम अधिकारी ऋषिकेश जयकर, व्यवस्था प्रमुख ऋषीकेश देशमुख, निलेश कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. सामूहिक सूर्यनमस्कार शाळांना यावेळी स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

  

 
Top